
महापालिका क्षेत्रातील दृष्टिहीन तसेच 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींना ‘बेस्ट’ बसेसमधून विनामूल्य प्रवासाची सवलत दिली जाते. या खर्चाची प्रतिपूर्ती म्हणून महापालिकेकडून 7 कोटी 64 लाख 55 हजार 170 रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. महापालिका आयुक्तांनी या खर्चाला मंजुरी दिली असून, अंतिम मान्यतेसाठी हा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर ठेवण्यात आला आहे.
दिव्यांगांच्या कल्याणासाठी समान संधी व हक्कांचे संरक्षण कायद्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांना आपल्या अंदाजपत्रकातील किमान 5 टक्के निधी दिव्यांगांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नागरी वाहतूक व्यवस्थेमध्ये दिव्यांगांना सवलत देऊन त्या खर्चाची भरपाई केली जाते. यानुसार साध्या विना-वातानुपूलित बेस्ट बसेसमधून दृष्टिहीन व 40 टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांग व्यक्तींना 100 टक्के मोफत प्रवासाची सवलत दिली जाते.
– बेस्ट उपक्रमाने मागील वर्षातील मोफत प्रवासापोटी झालेल्या खर्चाची 7 कोटी 64 लाख 55 हजार 170 रुपयांची देयके प्रतिपूर्तीसाठी महापालिकेकडे सादर केली होती. त्यानुसार महिला व बालकल्याण विभागाच्या अंदाजपत्रकातील उपलब्ध 5 कोटी रुपयांमधून ही रक्कम भागवली जाईल. उर्वरित 2 कोटी 64 लाख 55 हजार 170 रुपयांची तूट भरून काढण्यासाठी नियोजन विभागाच्या इतर लेखाशीर्षातून निधीचे पुनर्वाटप केले जाणार आहे. यापूर्वीच्या आर्थिक वर्षात पालिकेने 4 कोटी 88 लाख 4 हजार 983 रुपयांचे अनुदान मंजूर केले होते.
गणेशभक्तांच्या सोयीसाठी ‘बेस्ट’ रात्रभर धावणार
बेस्ट उपक्रमाच्या वाहतूक विभागाने यंदा गणेशभक्तांच्या सोयीसाठी जादा बस करण्याच्या सोडण्याची तयारी केली आहे. लालबाग, परळ, गिरगाव, खेतवाडी आदी ठिकाणी लक्ष पेंद्रित करून 14 ते 24 सप्टेंबर या कालावधीत एपूण 10 बसमार्गांवर संपूर्ण रात्रभर 26 गाडय़ांची सेवा देण्यात येणार आहे. रात्री साडेदहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत या बसेस गणेशभक्तांच्या सेवेत सज्ज राहणार आहेत. ओशिवरा, शिवाजीनगर, देवनार, बॅकबे, मुंबई सेंट्रल, वरळी, सांताक्रुझ, वडाळा, काळा किल्ला या आगारांमार्फत जादा बसगाडय़ांची व्यवस्था केली जाणार आहे. दक्षिण मुंबईबरोबरच पश्चिम उपनगरात ओशिवरा आणि सांताक्रुझपर्यंत जादा बसगाडय़ा धावणार आहेत.


























































