
जुन्या पेन्शन योजनेपासून वंचित ठेवण्यात आल्याच्या निषेधार्थ राज्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शिक्षक दिनी (दि. 5) अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळ्या फिती लावून धरणे आंदोलन केले. जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी आंदोलक शिक्षकांनी घोषणाबाजी करीत शासनाच्या धोरणाचा निषेध केला. आंदोलकांच्या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून गेला.
दि. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त झालेल्या विनाअनुदानित अथवा अंशतः अनुदानित कायम आस्थापनेवरील नियमित वेतनश्रेणीतील तसेच त्यानंतर 100 टक्के अनुदान प्राप्त प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आणि तुकडय़ांवरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 1982ची जुनी सेवानिवृत्ती वेतन योजना लागू करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. राज्यातील 26 हजार पेन्शनपीडित शिक्षक-कर्मचाऱ्यांना 1982ची जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
जुनी पेन्शन कोअर कमिटीचे राज्य सचिव महेंद्र हिंगे, राज्य समन्वयक सुनील भोर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी सुनील पंडित, आप्पासाहेब शिंदे, बाबासाहेब बोडखे, रमजान हवालदार, आप्पासाहेब जगताप, सचिन झगडे, भाऊसाहेब कचरे, देविदास खेडकर, संजय इघे, सुनील दानवे, संजय वाळे, राज गवांदे सहभागी झाले होते.


























































