पुणेकरांचा निर्धार, डीजेबंदीशिवाय माघार नाही!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘आवाज बंद कर डीजे, तुला पुणेकरांची शपथ हाय, संपूर्ण डीजेबंदी झालीच पाहिजे’, ‘शांतता आमचा हक्क आहे.’ ‘ग… गणपतीचा, नको गोंधळाचा’, ‘माझे कान… माझा अधिकार’, अशा घोषणा देत, हातात फलक घेऊन पुणेकरांनी डीजे बंदीसाठी आवाज उठवला. ‘सोलापूर, मुंबई, नागपूरला डीजे बंद होऊ शकते, तर पुण्यात का नाही?’ असा सवाल उपस्थित केला. ध्वनिप्रदूषणाविरुद्ध आवाज उठवणारे विद्यानंद बापट यांना महापालिकेच्या नागरी सभेत विरोधाला सामोरे जावे लागले. भूमिका मांडत असताना त्यांना मारहाण झाली. त्याचा निषेध करत मोर्चात अनेकांनी सहभाग घेतला होता.

‘लाऊड स्पीकरविरोधी पुणेकर मंच’ने केलेल्या आवाहनानुसार आज सकाळी मोठय़ा संख्येने नागरिक मोर्चामध्ये सामील झाले होते. जंगली महाराज रस्त्यावरील झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकातून मोर्चास सुरुवात झाली. तत्पूर्वी पोलिसांचा मोठा फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला होता. मोर्चात सहभागी झालेल्या सामाजिक, राजकीय पदाधिकाऱयांसह तरुण-तरुणींनी डीजे बंदीसाठी घोषणाबाजी केली. पुणेरी चिमटे काढलेले फलक हातात घेऊन ध्वनिप्रदूषणाचा विरोध केला. सण-उत्सवातील डीजेच्या आवाजावर बंदी आणा, अशी मागणी पुणेकरांनी यावेळी केली.

विद्यानंद बापट  मोर्चात सहभागी झाले नाही

 ध्वनिप्रदूषणाविरुद्ध आवाज उठवणारे विद्यानंद बापट हे आजच्या मोर्चात सहभागी होणार होते. मात्र, सुरक्षिततेच्या कारणास्तव ते मोर्चात सहभाही होऊ शकले नाही. रविवारी सकाळपासून विश्रामबाग पोलिसांचे पथक त्यांच्या घराजवळ थांबले होते, तर रत्नागिरीमध्येही बापट यांच्या आई-वडिलांना पोलीस सुरक्षा देण्यात आली आहे.