दिंडोशीत घुमला तरुणाईचा आवाज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधत शिवसेना नेते-आमदार सुनील प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली व नगरसेवक अंकित प्रभू यांच्या संकल्पनेतून दिंडोशीची मानाची दहीहंडी तरुणाईला समर्पित करीत मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. कांदिवली पूर्व क्रांतीनगर येथील महाकाल गोविंदा पथकाच्या गोविंदांनी ही मानाची हंडी फोडली.

मालाड पूर्व येथील कुरारगाव स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानात कल्पतरू प्रतिष्ठानच्या वतीने तरुणाईला समर्पित या दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यात युवावर्ग मोठय़ा संख्येने सहभागी झाल होता. यावेळी महिलांसाठी आयोजित पैठणीचा खेळ उत्सवाचे आकर्षण ठरले. सुमारे दीडशे गोविंदा पथकांनी या दहीहंडी उत्सवात सहभाग घेतला.

आदित्य ठाकरे यांची उत्सवाला भेट

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनीही या दहीहंडी उत्सवाला भेट दिली. आदित्य ठाकरे यांची एण्ट्री होताच उपस्थित हजारो गोविंदा भान हरपून नाचले. आदित्य ठाकरे यांनीही त्यांना प्रतिसाद देताना गोविंदांशी हस्तांदोलन करत त्यांना शुभेच्छा दिल्या.

मराठी कलाकारांनी वाढवला गोविंदांचा उत्साह

आगामी ‘मैत्रेया’ या चित्रपटातील कलाकार समर्थ, आयुषी भावे, रुची आणि आकाश, चित्रपटाच्या दिग्दर्शिका क्रांती रेडकर तसेच तसेच ‘दशमी’ या चित्रपटाचे दिग्दर्शक योगेश भोसले, गौरी इंगवले, रवी प्रकाश, राज पुंदन, लेखक-संगीत दिग्दर्शक सुरेश पंडित व वेशभूषाकार राणी विश्वकर्मा यांनी या उत्सवाला उपस्थिती लावली. त्यांनी दहीहंडीचा जल्लोष प्रत्यक्ष अनुभवत सर्व पुरुष व महिला गोविंदांचा उत्साह वाढवला.

शिवसेना उपनेते अमोल कीर्तिकर, विभाग संघटिका शालिनी सावंत, विभाग क्र. 3 चे समन्वयक दीपक सुर्वे, उत्तर प्रदेश संपर्क प्रमुख अशोक तिवारी यावेळी उपस्थित होते.