मुंबई-गोवा महामार्गावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, गणेशभक्तांच्या सुखरूप प्रवासासाठी ‘विघ्नहर्ता’; उपअधीक्षकांसह ४३६ अधिकारी, कर्मचाऱ्यांचा २४ तास खडा पहारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बाप्पाच्या स्वागतासाठी कोकणात आपल्या गावी जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास यंदा सुखरूप होणार आहे. यासाठी ११ सप्टेंबरपासूनच मुंबई-गोवा महामार्गावरील पळस्पे ते पोलादपूर यादरम्यान ठिकठिकाणी मदत केंद्रे उभारली जाणार असून ७ पोलीस उपअधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ४३६ अधिकारी-कर्मचारी २४ तास वाहतूक सुरळीत राहावी याकरिता प्रयत्न करणार आहेत. बिघाड होणारी वाहने आणि अपघातग्रस्त गाड्यांना रस्त्यातून बाजूला करण्यासाठी क्रेन, हायड्राची मदत घेतली जाणार आहे. तसेच जखमींना वेळेत उपचार मिळावेत म्हणून दहा रुग्णवाहिका आणि पेट्रोलिंगसाठी २० दुचाकी तैनात केल्या जाणार आहेत.

१४ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. मात्र ११ सप्टेंबरपासूनच चाकरमान्यांची पावले कोकणाकडे वळण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गासह रायगड जिल्ह्यातील प्रमुख मार्गांवर होणारी संभाव्य वाहतूक कोंडी आणि अपघातांचे आव्हान लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. गणेशोत्सवाच्या काळात
रुग्णवाहिका, क्रेन, हायड्रासह पेट्रोलिंगसाठी दुचाकींचा ताफा

पोलीस सुविधा केंद्र
महामार्गावर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याने वाहतूक सुरळीत ठेवण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर असणार आहे. हे आव्हान पेलण्यासाठी ७ पोलीस उपअधीक्षक, ११ पोलीस निरीक्षक, ४२ सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, ६५ वाहतूक अंमलदार, २११ पोलीस कर्मचारी आणि १०० होमगार्ड असा मोठा फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला आहे.

वाहन बंद पडले तर तत्काळ मिळणार मदत
गणेशोत्सवाच्या काळात महामार्गावर वाहन बंद पडणे अथवा अपघात होणे ही वाहतूककोंडीची प्रमुख कारणे ठरू शकतात. त्यामुळे अशा वाहनांना तातडीने रस्त्याच्या बाजूला हटविण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावर १० क्रेन आणि २ हायड्रा तैनात ठेवण्यात येणार आहेत. याशिवाय अपघातग्रस्तांना तातडीने वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी १० रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

ट्रॅफिक कोंडीच्या हॉटस्पॉटवर ‘पेट्रोलिंग’
महामार्गावरील वाहतुकीवर सतत लक्ष ठेवण्यासाठी २० मोटारसायकलींच्या माध्यमातून पेट्रोलिंग करण्यात येणार आहे. प्रत्येक मोटारसायकलवर एक पोलीस अधिकारी आणि एक पोलीस कर्मचारी कार्यरत राहणार असून वाहतूककोंडी, अपघात किंवा वाहन बिघाडाची माहिती मिळताच हे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचणार आहे. महामार्गावर एखादी दुर्घटना घडल्यास अथवा वाहतूककोंडी निर्माण झाल्यास तातडीने समन्वय साधता यावा यासाठी २७ वॉकीटॉकी आणि १० बिनतारी संच उपलब्ध ठेवण्यात आले आहेत.