
बाॅलीवूडमध्ये सध्याच्या घडीला रणवीर सिंगच्या प्रलय या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू झालेली आहे. नुकताच प्रलयच्या सेटवरील रणवीर सिंगचा लूक व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या लूकबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झालेली आहे. रणवीरचा हा रांगडा लूक सध्या चर्चेचा विषय बनला आहे. या व्हिडीओमध्ये रणवीर सोबत कल्याणी प्रियदर्शनही दिसत आहे.
‘प्रलय’ हा पोस्ट-अपोकॅलिप्टिक म्हणजेच महाविनाशानंतरच्या जगावर आधारित सर्व्हायव्हल थ्रिलर असल्याचे म्हटले जात आहे. झोम्बींनी व्यापलेल्या या जगात रणवीर मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे. कल्याणी प्रियदर्शनही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत असल्याचे समोर आले आहे. चित्रपटाच्या सेटवरील हे फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी रणवीरच्या लूकचे कौतुक करण्यास सुरुवात केली. चित्रपटसृष्टीत झोम्बी आणि सर्व्हायव्हल थ्रिलर या प्रकारावर तुलनेने कमी चित्रपट बनले आहेत. त्यामुळे रणवीरला अशा वेगळ्या जॉनरमध्ये पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
एका सोशल मीडिया वापरकर्त्याने या लीक झालेल्या फुटेजमुळे चित्रपटाबाबत सकारात्मक चर्चा सुरू झाल्याचे म्हटले, तर काही चाहत्यांनी रणवीरचा हा चित्रपट त्याच्या कारकिर्दीतील सर्वात प्रभावी चित्रपटांपैकी एक ठरू शकतो, अशी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, ‘प्रलय’चे चित्रीकरण नुकतेच सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. चित्रपटाचे बजेट सुमारे 300 कोटी रुपये असल्याची चर्चा आहे. ही आकडेवारी अधिकृतरीत्या स्पष्ट झालेली नसली तरी एवढ्या मोठ्या बजेटमुळे चित्रपटाचा भव्य आवाका पाहायला मिळण्याची शक्यता आहे.



























































