प्रसिद्ध गायक निसार वायनाड यांचे दुबईत निधन; वयाच्या 44 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रसिद्ध गायक निसार वायनाड यांचे शनिवारी संध्याकाळी दुबईतील एका रुग्णालयात निधन झाले. ते 44 वर्षांचे होते. अजमान येथे आयोजित आपल्या संगीत कार्यक्रमाच्या काही तास आधीच त्यांनी जगाचा निरोप घेतला. मूळचे निसार आरोथ इब्राहिम असे नाव असलेल्या या गायकाच्या पश्चात त्यांची पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे.

‘गल्फ न्यूज’च्या अहवालानुसार, शनिवारी दुपारी त्यांना ताप आला होता, त्यानंतर त्यांना लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय कागदपत्रांनुसार त्यांच्या मृत्यूचे थेट कारण ‘एसिडोसिस’ असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यासोबतच संसर्गामुळे अवयव निकामी होण्याचा आजार आणि ‘सेप्टिसेमिया’ हे त्यांच्या मृत्यूचे मुख्य कारण नोंदवण्यात आले आहे. त्यांना झालेल्या तीव्र संसर्गामुळे शरीरातील अवयव निकामी झाले आणि रक्तासह इतर द्रवांमध्ये आम्लाचे प्रमाण प्रचंड वाढले. निसार यांना मधुमेह होता, मात्र त्यांच्या इतर कोणत्याही आजाराविषयी माहिती नव्हती. त्यांचे जवळचे मित्र नौजास कयाक्कुल हे त्यांच्याशी संवाद साधणारे शेवटचे व्यक्ती होते. नौजास यांनी दिलेल्या माहितीनुसार, निसार गेल्या काही दिवसांपासून तापाने फणफणले होते, मात्र ते पॅरासिटामॉल घेऊन ताप कमी होईल या आशेवर होते. परिस्थिती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांचे सर्व प्रयत्न अपुरे पडले. वडिलांच्या निधनानंतर निसार यांनी अत्यंत कमी वयात कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली होती.

निसार वायनाड यांच्या पार्थिवावर केरळमधील त्यांच्या मूळ गावी वायनाड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यसंस्कारासाठी सुमारे 300 मित्र आणि चाहते उपस्थित होते. अवघ्या चार तासांत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पार्थिव मायदेशी पाठवण्यात आले.