
गुवाहाटीमध्ये धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांतच पतीने पत्नीची क्रूर हत्या केली. कौटुंबिक वादातून पतीने आधी पत्नीची हत्या केली. मग बोटे कापली आणि शीर धडावेगळे करून फ्रीजमध्ये ठेवले. शेजाऱ्यांना घरातून दुर्गंधी आल्याने त्यांनी पोलिसांना कळवले. यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. रिया तालुकदार असे मयत महिलेचे नाव आहे.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, या जोडप्याचे काही महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. दोघे गुवाहाटीतील एका अपार्टमेंटमध्ये राहत होते. दोन दिवसांपासून दोघांनाही शेजाऱ्यांनी पाहिले होते. रविवारी घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत कुलूप तोडून पाहिले असता आत रियाचा मृतदेह आढळला. तिची बोटे कापली होती आणि डोके गायब होते.
पोलिसांनी घराची झडती घेतली शीर फ्रीजमध्ये एका पॉलिथीन बॅगमध्ये आढळले. मृतदेह कुजायला सुरवात झाली होती. यामुळे दुर्गंधी पसरली होती. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. यानंतर तिच्या पतीचा शोध सुरू केला. अखेर रविवारी रात्री पतीने स्वतः पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
पोलीस आरोपीची चौकशी करत आहेत. चौकशीनंतरच या हत्येमागील नेमका हेतू उघड होईल. पोलीस संपूर्ण घटनाक्रम तपासत आहेत. तसेच या हत्येत आणखी कुणाचा सहभाग होता का याबाबतही तपास करत आहेत.























































