
आगामी रामायण या चित्रपटासाठी यशने एक मास्टरस्ट्रोक खेळत सर्वांचीच बोलती बंद केली आहे. नुकताच त्याचा टाॅक्सिक हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटानंतर आता यशचा रामायण हा चित्रपट येणार आहे. परंतु चित्रपट रिलीज होण्याआधीच यशने त्याचे फासे टाकले आहे. रामायण या चित्रपटामध्ये यश हा रावणाची भूमिका साकारत आहे. मुख्य म्हणजे केवळ अभिनयापुरता तो या चित्रपटाशी संबंधित नसून, या चित्रपटाचा तो सहनिर्माता देखील आहे.
‘रामायण’च्या दोन्ही भागांसाठी यशचे मानधन हे 100 कोटी ठरले होते. परंतु निश्चित झालेल्या मानधनावर आता यशने काट मारली आहे. मानधन न घेता आता यशने वितरणाचे हक्क घेतले आहेत. ‘सॅकनिल्क’च्या अहवालानुसार, यशला आता त्याने निभावलेल्या भूमिकेसाठी मानधनाऐवजी, दक्षिण हिंदुस्थानमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या चित्रपटाच्या वितरणाचे हक्क देऊ करण्यात येणार आहेत. मुख्य म्हणजे दोन्ही भागांच्या वितरणाचे हक्क आता यशकडे राहणार आहेत. यशचे स्वतःचे माॅन्सटर माइंड क्रिएशन्स या नावाची निर्मिती संस्था आहे. याच निर्मिती संस्थेमार्फत हा व्यवहार होणार असल्याचे म्हटले जात आहे.
नुकत्याच झालेल्या या नव्या करारानुसार चित्रपटाचे उत्पन्न हे बाजारपेठेतील चित्रपटाला मिळणाऱ्या प्रतिसादावर अवलंबून असणार आहे. अपेक्षित कमाई या चित्रपटाने केल्यास, मानधनाच्या तुलनेत हा करार फायदेशीर ठरु शकतो असे वृत्त टाइम्स आॅफ इंडियाने दिले आहे. ‘रामायण’मध्ये रणबीर कपूर प्रभू रामाच्या, साई पल्लवी सीतेच्या, यश रावणाच्या आणि सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहेत. नितेश तिवारी दिग्दर्शित हा महाकाव्यपट दोन भागांत प्रदर्शित होणार आहे. पहिला भाग नोव्हेंबर 2026 मध्ये, तर दुसरा भाग दिवाळी 2027 मध्ये प्रदर्शित होण्याचे नियोजन आहे.



























































