
गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने कोकणवासीयांची ‘सामान पॅकिंग’ची लगबग सुरू झाली आहे. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगडला जाणाऱ्या लाखो गणेशभक्तांमुळे एसटीच्या तब्बल ५७४१ गाड्या, तर ३६० हून अधिक जादा रेल्वे गाड्यांचे आरक्षण ‘फुल्ल’ झाले आहे. अडीच लाखांहून अधिक चाकरमानी एसटीच्या ताफ्यातील नव्या ‘लालपरी’तून गाव गाठणार आहेत.
याचवेळी एसटी महामंडळाच्या नव्या ‘लालपरी’ गाड्यांना प्रवाशांची मोठी पसंती लाभली आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर विभागांतून ९ ते १४ सप्टेंबरदरम्यानच्या एकूण ५७४१ जादा गाड्यांचे आरक्षण ‘फुल्ल’ झाले आहे. नव्या गाड्या आणि थेट आपले गाव गाठता येत असल्यामुळे यंदा एसटीच्या जादा गाड्यांचे आरक्षण अल्पावधीत ‘फुल्ल’ झाले आहे. ‘लालपरी’ बससह ‘जिजाऊ’ बसलाही प्रवाशांची मोठी पसंती लाभली असून एसटीच्या जादा बसगाड्यांमधून २ लाख ५८ हजारांहून अधिक गणेशभक्त कोकणातील गाव गाठणार आहेत. एसटी महामंडळाने कोकणवासीयांच्या परतीच्या प्रवासासाठीही विशेष व्यवस्था केली असून ‘ग्रुप बुकिंग’चे प्रमाण सर्वाधिक असल्याची माहिती एसटीच्या वाहतूक विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
एसटीची जादा वाहतूक
| विभाग | ग्रुप बुकिंग | जादा गाड्या | एकूण |
| मुंबई | १७८० | २२५ | २००५ |
| ठाणे | २७७६ | ३१५ | ३०९१ |
| पालघर | ६२८ | १७ | ६४५ |
| एकूण | ५१८४ | ५५७ | ५७४१ |
मुंबई-गोवा महामार्गावर २४ तास दुरुस्ती पथके
मुंबई-गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी खड्ड्यांचे ‘विघ्न’ कायम आहे. खड्डेमय रस्त्यातून एसटी चालवताना गाड्यांमध्ये बिघाड होण्याची भीती सतावत आहे. याच शक्यतेतून बसगाड्या वेळीच दुरुस्त करण्यासाठी एसटी महामंडळाने तयारी केली आहे. त्यानुसार मुंबई-गोवा महामार्गावर २४ तास फिरती दुरुस्ती पथके आणि ब्रेकडाऊन व्हॅन तैनात राहणार आहेत. इतर जिल्ह्यांतील गाड्या कोकणवासीयांच्या सेवेसाठी मुंबई-ठाण्यातून कोकणातील गावांपर्यंत धावणार आहेत.




























































