
गेल्याच महिन्यात राज्यात विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहीम राबविण्यात आली असून 31 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. यानंतर आता विविध राज्यात ही प्रक्रिया सुरू करण्यात आली असून सध्या झारखंडमध्ये एसआयआर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र, या मोहिमेदरम्यान जमशेदपूर पूर्व विधानसभा मतदारसंघातील मतदारयादीच्या कागदपत्र पडताळणीमध्ये तीन अफगाणिस्तानचे नागरिक असल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, असिल खान, मोहम्मद अस्लम आणि मोहम्मद इब्राहिम अशी या तीन मतदारांची नावे असून त्यांची नावे आधिच या याद्यांमध्ये समाविष्ट होती. एसआयआर प्रक्रियेच्या पडताळणीदरम्यान कागदपत्रांमध्ये तफावत आढळल्याने निवडणूक प्रशासनाने या तिघांना नोटीस बजावली. मात्र, मागितलेली कागदपत्रे ते सादर करू शकले नाहीत. त्यानंतरच्या तपासणीत त्यांचे पासपोर्ट सापडले, ज्यावरून ते अफगाणिस्तानचे नागरिक असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत निवडणूक आयोगाने तिघांचीही नावे मतदारयादीतून तात्काळ वगळल्याची माहिती आहे.
झारखंडचे मुख्य निवडणूक अधिकारी के. रवी कुमार यांनी या प्रकरणास दुजोरा दिला आहे. एकाची नागरिकता निश्चित झाली असून इतर दोघांची चौकशी सुरू आहे. परदेशी नागरिकांची नावे मतदारयादीत कशी समाविष्ट झाली आणि त्यांना कोणी मदत केली? याचा सखोल तपास करण्याचे आदेश प्रशासनाने दिले असून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.
या दरम्यान प्रशासनाकडून या तिघांसह त्यांच्या कुटुंबीयांच्या कागदपात्रांचीही तपासणी केली जाणार आहे. झारखंडमध्ये अशा प्रकारे आणखी काही परदेशी नागरिकांची नावे मतदारयादीत समाविष्ट असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जमशेदपूरचे उपायुक्त आणि पोलीस अधीक्षक या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करत असून पुढील कारवाई सुरू आहे.


























































