कानपूरमध्ये पुरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड सिरप, तीन मुलांची प्रकृती बिघडली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये झालेल्या धुवाधार पावसामुळे नागरिकांना पूरपरिस्थितीचा सामना करावा लागत आहे. कानपूरच्या पांडु नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने बर्रा मायापुरम भागातील नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीत पूरपरिस्थितीचा सामना करणाऱ्या नागरिकांसाठी आरोग्य विभागाने वाटलेल्या मदतीमध्ये मोठा हलगर्जीपणा समोर आला आहे. पूरग्रस्तांना वाटण्यात आलेल्या औषधांमध्ये जुलै 2026 मध्ये कालबाह्य (expired) झालेली कफ सिरप दिल्याचे उघडकीस आले आहे. हे सिरप प्यायल्यानंतर अनेक लहान मुलांची प्रकृती अचानक बिघडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

सोमवारी दुपारी आरोग्य विभागाची एक टीम मायापुरम भागातील सुमारे 20 पूरग्रस्त कुटुंबांना औषधोपचार व मदत वाटण्यासाठी गेली होती. यादरम्यान वाटण्यात आलेल्या औषधांमध्ये एका कफ सिरपची मुदत जुलै 2026 मध्येच संपली होती. हे सिरप पिल्यानंतर एक 4 वर्षांचा मुलगा आणि इतर दोन 3 वर्षांच्या बालकांना उलट्या व त्रास होऊ लागला. पालकांनी त्यांना तत्काळ एका खासगी डॉक्टरांकडे नेल्याने त्यांच्यावर योग्य उपचार करण्यात आले.

एकाच वेळी अनेक मुलांची प्रकृती बिघडल्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी ती कथित कालबाह्य सिरप आणि इतर औषधे फेकून दिली. त्यानंतर मंगळवारी जेव्हा आरोग्य पथक पुन्हा औषधे घेऊन त्या भागात पोहोचले, तेव्हा पूरग्रस्तांनी मुलांच्या जीवाशी खेळ होण्याच्या भीतीपोटी औषधे घेण्यास स्पष्ट नकार दिला. एवढेच नाही तर, संतप्त पालकांनी तक्रारी केल्यांनंतर आरोग्य पथकाने चूक मान्य करत उपचारासाठी केवळ 100 रुपये देऊ केले. मात्र पीडित कुटुंबांनी ते घेण्यापासून नकार दिला.

पांडू नदीच्या वाढत्या पाणीपातळीमुळे आधीच घरे उद्ध्वस्त झालेल्या आणि साथीच्या आजारांच्या छायेखाली वावरणाऱ्या नागरिकांमध्ये या घटनेमुळे प्रशासनाबद्दल तीव्र संताप उसळला आहे. या गंभीर प्रकाराबाबत विचारणा केली असता, कानपूरचे मुख्य वैद्यकीय अधिकारी (CMO) डॉ. हरदत्त नेमी यांनी प्रकरण गांभीर्याने घेतले असून या प्रकरणाची कसून चौकशी सुरू असल्याचे आणि चौकशीनंतरच पुढील कारवाई व प्रतिक्रिया दिली जाईल, असे स्पष्ट केले आहे.