‘काला हिरण’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर पुन्हा प्रश्नचिन्ह; सलमानच्या वकिलांचा न्यायालयामध्ये युक्तिवाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सलमान खान आणि काला हिरण या चित्रपटाभोवतीचा वाद आता आणखी गडद झालेला आहे. या चित्रपटाचा वाद आता दिल्ली उच्च न्यायालयामध्ये पोहोचला आहे. चित्रपटासंदर्भातील सुनावणीदरम्यान सलमान खानचे वकील आणि चित्रपट निर्माते अमित जानी यांच्या वकिलामध्ये जोरदार युक्तिवाद घडला. त्यामुळेच आता हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये की ओटीटीवर प्रदर्शित होणार याबाबत अद्यापही कोणतीही स्पष्टता नाही.

चित्रपट प्रदर्शन सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती ज्योती सिंह यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख विचारली होती. यावर निर्माते अमित जानी यांच्या वकिलांनी सूचना घेण्यासाठी वेळ मागितला. तसेच म्हटले की, हा चित्रपट अद्याप प्रदर्शनासाठी तयार नाही. हा चित्रपट केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाकडे प्रमाणपत्राकरता सादर करण्यात आलेला नसून, ट्रेलरही अद्याप प्रदर्शित झाला नसल्याचे सांगण्यात आले.

सलमान खानच्या वकिलांनी यावेळी ओटीटी प्रदर्शनाचा मुद्दा देखील उपस्थित केला. तसेच ओटीटीवर चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी सेन्साॅर प्रमाणपत्राची आवश्यकता नसल्याचे त्यांनी म्हटले. याप्रकरणी न्यायालयाने निर्मात्यांना दोन आठवड्यांच्या आता उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच यासंदर्भातील पुढील सुनावणी 30 सप्टेंबरला होणार आहे.

‘काला हिरण : द बॅटल फॉर लेगसी’ हा चित्रपट राजस्थानातील काळवीट शिकार पार्शभूमीवर बेतलेला आहे. 1998 साली काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानचे नाव समोर आले होते. सदर चित्रपटाची कथा तसेच इतर अनेक बाबी सलमान खानशी संबंधित असल्याचा आक्षेप सलमानच्या टीमकडून घेण्यात आलेला आहे. या चित्रपटाच्या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाकडून याआधी देखील नोटीस बजावण्यात आली होती.