
पावसाने दडी मारल्याने तापमानात वाढ झाली असून सप्टेंबरमध्येच ऑक्टोबर हीटचे तडाखे बसू लागले आहेत. आज दुपारी १ वाजता ठाण्याचा पारा ३२ अंशांवर गेल्याने ठाणेकरांचा घामटा निघाला. हवेतील आर्द्रता आणि वाढलेले तापमान यामुळे दुपारच्या वेळी तीव्र उकाडा जाणवू लागला आहे.
काही दिवसांपासून वातावरणात कमालीचे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पावसामुळे पाठ फिरवली असल्याने ऊन-पावसाचा खेळ सुरू झाला आहे. दिवसभर चटके बसणारे ऊन, सायंकाळी पावसाच्या हलक्या सरी आणि रात्री कडाक्याची थंडी अशा तिहेरी वातावरण बदलामुळे व्हायरल इन्फेक्शनच्या रुग्णांत वाढ झाली आहे. बुधवारी पारा तब्बल ३२.३ अंशांवर गेल्याने नागरिकांना सप्टेंबरमध्येच ऑक्टोबर हीटचा तडाखा सहन करावा लागत आहे. यामुळे अशा वातावरणात नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.
आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता
उन्हाचा तडाख्यामुळे नागरिक अक्षरशः हैराण होत असताना रात्री मात्र वातावरणात गारवा पसरतो. गेल्या ५ दिवसांपासून असेच हवामान आहे. हवेमध्ये उष्णता आणि आर्द्रता वाढल्याने हे वातावरण विषाणूच्या वाढीसाठी पोषक असते. या बदल त्या तापमानाशी जुळवून घेण्यास शरीराला वेळ लागतो. परिणामी या काळात संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
























































