
‘आरक्षणाच्या नावाखाली सातत्याने मराठा समाजाची फसवणूक करण्यात येत आहे. अध्यादेश काढले जातात, प्रमाणपत्र दिले जातात आणि पुन्हा ते रद्दही केले जातात. नुसता पोरखेळ चालला आहे. त्यामुळे आता मुंबईत जाण्याशिवाय पर्याय नाही. अंतरवाली सराटीतून 15 सप्टेंबर रोजी मराठा आंदोलक मुंबईकडे प्रयाण करतील. 19 सप्टेंबरपासून आझाद मैदानावर उपोषण सुरू होईल…’ अशी घोषणा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी केली. ही घोषणा करताना जरांगे यांना अश्रू अनावर झाले.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणाचा आज पंधरावा दिवस होता. अंतरवालीत आज मराठा समाजाची बैठकही बोलावण्यात आली होती. या बैठकीतच मनोज जरांगे यांनी आरक्षणासाठी पुन्हा मुंबईत आंदोलन करण्याची घोषणा केली. ही शेवटची लढाई असून त्यात घराघरातून मराठय़ांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. ज्यांना मुंबईत येणे शक्य नाही त्यांनी मराठा आंदोलकांना निरोप देण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभे राहावे, असेही ते म्हणाले.
महिलांनी फडणवीस, शिंद्यांकडे हळदी-कुंकवाला जावे!
मराठा महिलाही मुंबईत येणार आहेत. त्यांनी अमृता फडणवीस आणि लता शिंदे यांच्या बंगल्यावर हळदी कुंकवाला जावे. त्यांना हिंदू संस्कृतीची जाण असेल तर दाराबाहेर येतील. हळदी-कुंकू देताना त्यांना सांगा, ‘साहेबांना सांगा आरक्षण द्या.’ शिंदे, फडणवीसांच्या लाडक्या बहिणी आहेत. ते तुम्हाला बाहेर काढणार नाहीत.
गणपती बसवायचा आणि निघायचं…
14 सप्टेंबरला गणेश चतुर्थी आहे. त्या दिवशी गणपती बसवायचा आणि 15 सप्टेंबरला सकाळी 10 वाजता अंतरवालीहून मुंबईकडे निघायचं, असे जरांगे म्हणाले. मराठय़ांच्या विराट जनसागराचे वादळ, मराठय़ांच्या समुद्रासोबत अंतरवाली ते मुंबई आझाद मैदान अशी रॅली काढायची. यासाठी तयारीला लागा, असे आवाहनही जरांगे यांनी आंदोलकांना केले. यावेळी आंदोलकांनी भगवी उपरणी फडकवत जरांगे यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला.
- 15 सप्टेंबर
पहिला मुक्काम
पाटोदा
बीड
- 16 सप्टेंबर
दुसरा मुक्काम
श्रीगोंदा
अहिल्यानगर
- 17 सप्टेंबर
तिसरा मुक्काम
हडपसर
पुणे
- 18 सप्टेंबर
चौथा मुक्काम
खोपोली
रायगड
- 19 सप्टेंबर
अंतिम मुक्काम
आझाद मैदान
मुंबई




























































