
आत्महत्येच्या उद्देशाने विद्युत तारेवर चढलेल्या 25 वर्षीय युवकामुळे शेवगाव शहरात सकाळी तब्बल तासभर थराराचे वातावरण निर्माण झाले. शेवगाव-पांढरीपूल राज्य मार्गावरील न्यायालय परिसरात या घटनेमुळे नागरिकांची मोठी गर्दी झाली. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्याने काही काळ वाहतुकीची कोंडी झाली. विशेष म्हणजे, विद्युत वाहिनीचा पुरवठा दुरुस्तीच्या कामासाठी बंद असल्याने मोठी दुर्घटना टळली.
सुनिल रामदास बर्डे (वय 25, रा. रमजान चिंचोली, ता. कर्जत) हा युवक आज सकाळी दहाच्या सुमारास शेवगाव शहरातील न्यायालय परिसरातील विद्युत तारांवर चढला. युवक आत्महत्येच्या उद्देशाने विद्युत तारेवर चढल्याचे स्पष्ट झाल्याने बघ्यांची गर्दी वाढत गेली. युवक विद्युत तारेवर इकडून तिकडे फिरत असल्याने त्याला खाली उतरविण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच पोलिस कर्मचारी, वायरमन घटनास्थळी दाखल झाले. काही तरुणांनी धाडस करून विद्युत खांबावर चढत त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुनिल बर्डे त्यांना चकवा देत तारांवरून इकडून तिकडे फिरत होता. त्यामुळे त्याला थेट पकडणे धोकादायक ठरत होते.
सुदैवाने त्याच वेळी संबंधित विद्युत वाहिनीचा वीजपुरवठा दुरुस्तीच्या कामासाठी बंद होता. त्यामुळे युवक तारेवर असतानाही विजेचा धक्का बसण्याची शक्यता टळली. अखेर जेसीबीच्या सहाय्याने काही युवकांनी सुनिल बर्डे याच्याजवळ पोहोचून त्याला पकडले आणि खाली उतरविले. युवक सुरक्षितपणे खाली येताच उपस्थित नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
पोलिसांकडून चौकशी करण्यात येत असून, त्याने आत्महत्येचा प्रयत्न नेमका कोणत्या कारणामुळे केला, याचा तपास सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, पत्नीच्या त्रासातून त्याने हा टोकाचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे. तसेच त्याच्या मानसिक स्थितीबाबतही माहिती समोर आली आहे. मात्र या बाबत पोलिसांकडून अधिकृत माहिती मिळाल्यानंतरच नेमके कारण स्पष्ट होणार आहे. दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे जीव धोक्यात घातल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे समजते. दरम्यान, नागरिकांची गर्दी हटविताना पोलिसांची दमछाक झाली होती.

























































