पालघरमध्ये डॉक्टरला मारहाण, कर्मचाऱ्यावर हल्ला : आमदारपुत्र रोहित गावीतला चार दिवसांची पोलीस कोठडी, आरोपींची संख्या १४ वर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालघरच्या रिलीफ रुग्णालयातील डॉक्टरांना मारहाण आणि रुग्णालय कर्मचाऱ्यावरील हल्लाप्रकरणी शिंदे गटाचे आमदार राजेंद्र गावीत यांचा मुलगा रोहित गावीत याला पालघर पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली. त्याला आज पालघरच्या न्यायालयात हजर केले असता प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी.एस. चाळकर यांनी १६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली. या कारवाईमुळे रिलीफ हॉस्पिटल राडा प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या १४ वर पोहोचली आहे.

5 सप्टेंबर रोजी पालघरच्या रिलीफ रुग्णालयात घुसून शिंदे गटाचा जिल्हाप्रमुख कुंदन संख्ये, नगरसेवक नीलम संख्ये, आमदारपुत्र रोहित गावीत, साईराज पाटील, राहुल घरत, विक्की संख्ये, शुभम बांदिवडेकर, ऋषभ वारे यांनी ड्युटीवरील डॉक्टरला शिवीगाळ करत रुग्णालय कर्मचाऱ्यावर हल्ला केला होता. त्यानंतर हे सर्वजण फरार झाले. त्यातील निलंबित शहरप्रमुख राहुल घरत हा पोलिसांना शरण आला. त्याला पोलीस कोठडी ठोठावण्यात आली. मात्र उर्वरित आरोपी पोलिसांना सापडत नव्हते.

आमदार राजेंद्र गावीत यांचा मुलगा रोहित गावीत पोलिसांना सापडत नव्हता. मीरा रोड येथील घरात तो लपून बसला होता. मोबाईलमधील जुने सीम कार्ड काढून नवीन सीमकार्ड त्याने टाकले. त्यामुळे पोलिसांनी ट्रॅकिंग करून त्याला मीरा रोडच्या घरातून अटक केली. त्याला शुक्रवारी संध्याकाळी उशिरा पालघर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तिथे स्टेशन डायरी नोंद, अटक नोंद, वैद्यकीय तपासणी, हाताचे ठसे आदी कायदेशीर प्रक्रिया करून आज सकाळी न्यायालयात हजर करण्यात आले.

एफआयआरमधील अनोळखी व्यक्तींचा पोलिसांनी शोध केला. त्या तपासात या व्यक्ती गोविंदा पथकाशी संबंधित असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी बारा गोविंदांना अटक केली. त्यांनाही न्यायालयाने 15 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.