Jammu Kashmir- लश्कर नेटवर्कवर तपास यंत्रणांचा घाव; CIKची कुलगाम, शोपियानमध्ये छापेमारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू-कश्मिरमध्ये दहशतवादाच्या विरोधात तपास यंत्रणांची कारवाई सुरूच आहे. रविवारी काऊंटर इंटेलिजन्स कश्मिरने (CIK) दहशतवादाशी संबंधित एकाच वेळी अनेक ठिकाणी छापेमारी केली. कुलगाम जिल्ह्यातील विविध भागांमध्ये CIKच्या पथकांनी शोधमोहीम राबवली. त्याचबरोबर पुलवामा CIKच्या पोलीस उपअधीक्षकांच्या नेतृत्वाखालील पथकाने शोपियान जिल्ह्यातील नडीगाम येथे छापा टाकला. या कारवाईदरम्यान दिवंगत गुलाम हसन घनी यांचा मुलगा इरफान अहमद घनी याच्या घराचीही झडती घेण्यात आली.

शनिवारी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) लश्कर-ए-तोयबाशी संबंधित सीमापार दहशतवादी कटाच्या प्रकरणात जम्मू-काश्मीरमधील १० ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले होते. कुपवारा, कुलगाम, बांदीपोरा, बारामुल्ला आणि सोपोर या भागांत ही कारवाई करण्यात आली होती.

NIAचा तपास पाकिस्तानस्थित लश्कर-ए-तोयबाच्या नेत्यांशी तसेच त्यांच्या स्थानिक ओव्हरग्राउंड कार्यकर्त्यांच्या नेटवर्कशी संबंधित आहे. हे नेटवर्क घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय, रसद, शस्त्रे आणि इतर मदत पुरवत असल्याचा तपास यंत्रणांचा संशय आहे. या प्रकरणातील तपासाला ३१ मार्चला झालेल्या एका अटकेनंतर महत्त्वाची दिशा मिळाली. त्या रात्री लश्कर-ए-तोयबाशी संबंधित एका ओव्हरग्राउंड कार्यकर्त्याला चेकपॉईंटवर अटक करण्यात आली होती. त्याच्याकडून हँड ग्रेनेड आणि दारुगोळा जप्त करण्यात आला होता.

तपासात पाकिस्तानी सूत्रधारांकडून स्थानिक नेटवर्कचा वापर दहशतवाद्यांना लपवण्यासाठी, आश्रय देण्यासाठी, हेरगिरी करण्यासाठी आणि शस्त्रांचा पुरवठा करण्यासाठी केला जात असल्याचे समोर आल्याचे NIAने म्हटले आहे. या प्रकरणात करण्यात आलेल्या छापेमारीदरम्यान गुन्ह्याशी संबंधित कागदपत्रे आणि इतर साहित्यही जप्त करण्यात आले आहे.