
ट्रेनमधील प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू चोरणाऱ्या माजी पँट्री कार कर्मचाऱ्याला सरकारी रेल्वे पोलिसांनी (GRP) अटक केली आहे. कान्हू साहू (45) असे आरोपीचे नाव आहे. सीसीटीव्ही फुटेजमधील छायाचित्राशी त्याचा फोटो जुळल्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर संशय घेतला.
पोलिसांच्या माहितीनुसार, साहूचा किमान तीन चोरीच्या घटनांमध्ये सहभाग असल्याचा संशय आहे. त्याच्याकडून ४ लाख रुपये रोख, सोन्याचे दागिने, तीन मोबाईल आणि एक लॅपटॉप असा सुमारे ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. साहू हा ओडिशातील गंजाम जिल्ह्यातील कुलाड गावचा रहिवासी आहे.
इंडिया टुडेने दिलेल्या माहितीनुसार, 28 ऑगस्ट रोजी भुवनेश्वर-बेंगळुरू प्रशांती एक्स्प्रेसच्या A1 डब्यात झोपलेल्या आंध्र प्रदेशातील महिला प्रवाशाची बॅग चोरीला गेली होती. या बॅगेत सोन्याचे दागिने आणि मोबाईलसह इतर वस्तू होत्या. त्यानंतर बेरहामपूर येथे पोलिसांच्या तपासादरम्यान साहू संशयास्पदरीत्या आढळला. चौकशीदरम्यान त्याचा फोटो सीसीटीव्ही फुटेजशी जुळल्याचे पोलिसांनी सांगितले.
साहू यापूर्वी प्रशांती एक्स्प्रेसमध्ये पँट्री कर्मचारी म्हणून काम करत होता. गुन्हेगारी प्रकरणांमध्ये सहभाग आढळल्यानंतर त्याला नोकरीतून काढण्यात आले होते. चोरीचे काही सोन्याचे दागिने त्याच्या भावाने विकल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यातून मिळालेले 4 लाख रुपये साहूकडे सापडले. महिलेचे जवळपास सर्व दागिने पोलिसांनी जप्त केले असून तिचा मोबाईल अद्याप सापडलेला नाही. इतर चोरीच्या घटनांमध्ये त्याचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे.























































