ठसा – वसुंधरेचे मानकरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

<< भावेश ब्राह्मणकर

पाण्याची स्वच्छता ही मानवाच्या अस्तित्वाशी जोडलेली मूलभूत गरज आहे. मात्र आधुनिक जीवनशैलीने या पाण्यासमोर एक नवे आणि अदृश्य संकट उभे केले आहे. ते म्हणजे मायक्रोप्लॅस्टिकचे. प्लॅस्टिकच्या मोठ्या वस्तूंचे विघटन, कृत्रिम वस्त्रे, औद्योगिक प्रक्रिया आणि दैनंदिन वापरातून निर्माण होणारे अतिसूक्ष्म प्लॅस्टिकचे कण पाण्यात मिसळतात. आकाराने अत्यंत लहान असल्याने हे कण पारंपरिक पद्धतीने वेगळे करणे अनेकदा अवघड आणि खर्चिक ठरते. या जागतिक समस्येवर सोळा वर्षांच्या तीन भारतीय विद्यार्थ्यांनी चक्क चिंचेच्या टाकाऊ बियांपासून (चिंचोकी) उपाय शोधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या ‘प्लास-स्टिक’ या संकल्पनेला 2026 च्या ‘द अर्थ प्राईज’चा जागतिक पुरस्कार मिळाला असून ही कामगिरी भारतातील विद्यार्थी संशोधनासाठी महत्त्वाचा टप्पा ठरली आहे.

सुमारे 23 हजार व्यक्तींच्या सार्वजनिक मतदानानंतर विवान छावछरिया, अरियाना अग्रवाल आणि अव्याना मेहता या भारतीय विद्यार्थ्यांची निवड जागतिक विजेते म्हणून झाली. या तिघांनी मिळून ‘प्लास-स्टिक’ विकसित केले. पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेविषयी आणि ग्रामीण भागातील पाणी साठवणुकीच्या परिस्थितीविषयी निर्माण झालेल्या प्रश्नातून या प्रकल्पाची सुरुवात झाली.

भारतीय घरांमध्ये आणि खाद्य प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या चिंचेचा उरलेला भाग असलेल्या चिंचोक्या अनेकदा थेट कचऱ्यात जातात. विद्यार्थ्यांनी याच टाकाऊ घटकाकडे वेगळ्या नजरेने पाहिले. चिंचेच्या बियांपासून तयार केलेल्या जैवविघटनशील पावडरचा वापर पाण्यातील सूक्ष्म प्लॅस्टिक कणांना एकत्र आणण्यासाठी करता येतो, असे त्यांच्या प्रयोगातून दिसून आले.

मायक्रोप्लॅस्टिकचे स्वतंत्र कण अतिशय लहान असल्याने त्यांना पकडणे कठीण असते. परंतु ‘प्लॅस्टिक’मधील पदार्थ या कणांशी परस्परसंवाद साधून त्यांना मोठ्या गुठळ्यांमध्ये एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर या गुठळ्या चुंबकाच्या साहाय्याने पाण्यापासून वेगळ्या करता येतात, अशी या प्रकल्पाची संकल्पना आहे. त्यामुळे विजेवर चालणारी गुंतागुंतीची यंत्रणा किंवा मोठ्या प्रमाणावर फिल्टरिंग इन्फ्रास्ट्रक्चर आवश्यक नसल्याचा दावा या विद्यार्थ्यांनी केला आहे. यातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ‘कचऱ्यातून संसाधन’ ही संकल्पना. एका बाजूला पाण्यातील प्लॅस्टिक प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न आणि दुसऱ्या बाजूला कृषी किंवा खाद्य प्रक्रियेतील टाकाऊ घटकाचा पुनर्वापर-अशा दोन पर्यावरणीय प्रश्नांना एकाच वेळी भिडण्याचा प्रयत्न या प्रयोगातून झाला आहे.

प्लॅस्टिक प्रदूषणाची चर्चा झाली की, आपल्या डोळ्यांसमोर बाटल्या, पिशव्या, पॅकेजिंग किंवा समुद्रकिनाऱ्यावर साचलेला कचरा येतो. मात्र प्लॅस्टिकचे आणखी एक धोकादायक रूप डोळ्यांना दिसत नाही. मोठ्या प्लॅस्टिक वस्तूंचे तुकडे होत गेल्यानंतर तयार होणारे अतिसूक्ष्म कण म्हणजे मायक्रोप्लॅस्टिक. हे कण नद्या, तलाव, समुद्र आणि इतर जलस्रोतांमध्ये पोहोचू शकतात. याच अदृश्यतेमुळे समस्या अधिक गंभीर होते. पाण्यातील प्लॅस्टिकचे कण सहज दिसत नाहीत आणि त्यांना वेगळे करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या काही पारंपरिक तंत्रज्ञानात महागडी उपकरणे, फिल्टर, ऊर्जा किंवा प्रशिक्षित मनुष्यबळ आवश्यक असू शकते. त्यामुळे कमी साधनसुविधा असलेल्या भागांसाठी कमी खर्चातील पर्याय शोधणे महत्त्वाचे ठरते. प्लॅस्टिकची संकल्पना याच गरजेतून पुढे आली आहे.

आज जग मायक्रोप्लॅस्टिकच्या महासंकटाकडे गांभीर्याने पाहत आहे. अशा वेळी समाधानाचा मार्ग नेहमीच अत्याधुनिक प्रयोगशाळेतून किंवा कोट्यवधींच्या यंत्रणेतूनच मिळेल असे नाही. कधी कधी तो आपल्या अंगणात पडलेल्या एका साध्या चिंचेच्या बीमध्येही दडलेला असू शकतो. विवान, अरियाना आणि अव्याना यांनी जगाला हाच आशावादी संदेश दिला आहे. पर्यावरणाच्या मोठ्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी मोठे होण्याची गरज नाही; मोठा विचार करण्याची गरज आहे.

(लेखक पर्यावरणाचे अभ्यासक आहेत.)