
आशियाई स्पर्धेचा अधिकृत उद्घाटन सोहळा शनिवारी नागोया सिटी मिजुहो पार्क अॅथलेटिक स्टेडियमवर होणार आहे. सायंकाळी सहा वाजता सोहळ्याला सुरुवात होईल. मात्र फुटबॉल, बास्केटबॉल, व्हॉलीबॉलसह काही खेळांच्या लढती उद्घाटनापूर्वीच सुरू झाल्या आहेत. या सोहळ्यासाठी किमान 15 हजार खेळाडू सहभागी होणार आहेत. त्यामुळे अवघं आशिया खंड नागोयाच्या नगरीत एकची झाला आहे.
समुद्रावरच खेळाडूंचे घर!
यंदाच्या स्पर्धेतील सर्वाधिक चर्चेचा प्रयोग म्हणजे खेळाडूंसाठी क्रूझ जहाजाचा वापर. कोस्टा सेरेना क्रूझवर सुमारे पाच हजार जणांची व्यवस्था करण्यात आली आहे. स्वतंत्र मोठे अॅथलीट्स व्हिलेज उभारण्याऐवजी विद्यमान सुविधा, हॉटेल्स, तात्पुरती निवासस्थाने आणि क्रूझचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे जपानचा हा नवा प्रयोग खेळाडूंना किती भावतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
40 शहरांतून धावली मशाल
आशियाई स्पर्धेची मशाल आयची प्रांतातील 40 नगरपालिका आणि नागोयातील 16 वॉर्डमधून फिरली. एक हजार मशालधारकांनी या दौडीत सहभाग घेतला. 14 शाळांमधून स्वतंत्र स्कूल रिलेही घेण्यात आली. 18 सप्टेंबरला नागोयाच्या मध्यवर्ती भागात मशाल रिलेचा समारोप झाला.
नागोयात ‘वन एशिया वर्ल्ड’
हिसाया-ओदोरी पार्कमध्ये 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबरदरम्यान ‘वन एशिया वर्ल्ड’ फॅन झोन उभारण्यात आला आहे. विविध देशांचे सांस्कृतिक कार्यक्रम, आशियाई खाद्यपदार्थ, खेळाडूंसोबत संवाद आणि पदकविजेत्यांचे सत्कार येथे होणार आहेत. स्पर्धेचा उत्साह स्टेडियमबाहेरही पोहोचवण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे.
निवास व्यवस्थेची कसोटी
आयोजकांनी सुरुवातीला सुमारे 15 हजार खेळाडू व अधिकारी अपेक्षित धरले होते. प्रत्यक्ष नोंदणी सुमारे 17 हजारांपर्यंत पोहोचली. नव्या खेळांची भर आणि वाढलेल्या सहभागामुळे निवास व्यवस्थेवर ताण आला. काही खेळाडूंनी तात्पुरत्या निवासातील जागेबाबत चिंता व्यक्त केली आहे.
जपानचा सर्वांत मोठा ताफा
यंदाच्या स्पर्धेत यजमान जपानचे 919 खेळाडूंचे पथक सर्वांत मोठे आहे. चीनचे 803, दक्षिण कोरियाचे 780, थायलंडचे 682, हाँगकाँगचे 569 आणि कझाकस्तानचे 547 खेळाडू आहेत. हिंदुस्थानच्या खेळाडूंची संख्या अधिकृत नोंदीनुसार 500 च्या आसपास असून, अंतिम हिंदुस्थानी ताफ्यात 503 खेळाडू आहेत. जपानचे सर्वात मोठे पथक असले तरी सर्वाधिक पदके 803 खेळाडूंचा चीनच जिंकणार हे निश्चित आहे. चीनने गेल्या स्पर्धेत 201 सुवर्ण पदकांसह 388 पदके जिंकली होती.
























































