मिशन शतकासाठी हिंदुस्थानचे जम्बो पथक सज्ज, आयची-नागोयात तिरंगा फडकावण्याचे हिंदुस्थानी खेळाडूंचे ध्येय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हांगझोऊच्या मैदानावर 107 पदकांची ऐतिहासिक कमाई करून आशियाई क्रीडा विश्वात आपली ताकद दाखविल्यानंतर हिंदुस्थानची नजर आता आयचीनागोयातील नव्या शिखरावर आहे. हांगझोऊतील विक्रमाची पुनरावृत्ती करताना यंदा 100हून अधिक पदकांसाठी हिंदुस्थानी खेळाडूंनी एल्गार केला आहे. नेमबाजीच्या अचूक नेमापासून अॅथलेटिक्सच्या वेगवान पावलांपर्यंत, तिरंदाजीच्या लक्ष्यभेदापासून कुस्तीच्या मॅटवरील झुंजीपर्यंत आणि बॅडमिंटनच्या स्मॅशपासून हॉकीकबड्डीच्या सांघिक ताकदीपर्यंत अनेक क्रीडा प्रकार हिंदुस्थानच्या पदक मोहिमेचे केंद्र ठरणार आहेत. हांगझोऊने दिलेला आत्मविश्वास, आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभव आणि युवा खेळाडूंची वाढती ताकद यांच्या जोरावर पदकतालिकेत पुन्हा शंभरचा आकडा पार करण्यासाठी हिंदुस्थानी खेळाडू सज्ज झाले आहेत. आता आव्हान केवळ पदक जिंकण्याचे नाही, तर हांगझोऊच्या विक्रमाला नागोयात नवे शिखर देण्याचे आहे. ते गाठण्याचा निर्धार हिंदुस्थानच्या 503 खेळाडूंनी केला आहे.

नेमबाजी – मनूईशावर पदकांची जबाबदारी

पॅरिस ऑलिम्पिकची दोन पदके जिंकलेली मनू भाकर आणि हांगझोऊमध्ये चार पदके मिळवणारी ईशा सिंग हे नेमबाजीतील प्रमुख चेहरे आहेत. त्यांच्यासोबत रुद्रांक्ष पाटील, ऐश्वर्य प्रतापसिंग तोमर आणि मनीषा कीर यांच्याकडूनही पदकांची अपेक्षा आहे. रायफल, पिस्तूल आणि शॉटगनच्या विविध प्रकारांत हिंदुस्थानची मोठी फळी आहे.

अॅथलेटिक्स – सॅबलतूरपारूलची पदकदौड

नीरज चोप्राच्या अनुपस्थितीत अॅथलेटिक्सची जबाबदारी अविनाश सॅबल, तजिंदरपालसिंग तूर, पारूल चौधरी, अन्नू राणी, गुलवीर सिंग, एम. श्रीशंकर आणि ज्योती याराजी यांच्यावर असेल. सॅबल, तूर, पारूल आणि अन्नू यांनी हांगझोऊत सुवर्णपदक जिंकले होते. त्यामुळे अॅथलेटिक्सकडून यंदाही पदकांची मोठी अपेक्षा आहे.

तिरंदाजी – ज्योतीच्या अचूक बाणावर नजर

कंपाऊंड प्रकारात ज्योती सुरेखा वेन्नम ही हिंदुस्थानची प्रमुख आशा आहे. तिच्यासोबत चिकिता तनिपर्थी आणि कृथिका प्रदीप महिला संघात आहेत. पुरुषांच्या कंपाऊंडमध्ये साहिल जाधव, कुशल दलाल आणि गणेश मणी रत्नम यांच्याकडून अपेक्षा आहेत. रिकर्व्हमध्ये धीरज बोम्मादेवरा प्रमुख नाव आहे.

कुस्ती – अमनअंतिमची मल्लयुद्धाची तयारी

ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता अमन सेहरावत हा 57 किलो वजनी गटातील प्रमुख पदकदावेदार आहे. महिलांमध्ये अंतिम पंघाल हिच्याकडूनही पदकाची अपेक्षा आहे. हिंदुस्थानचे 16 मल्ल विविध वजनगटांत आव्हान देणार आहेत.

बॅडमिंटन – सिंधूलक्ष्यचिरागसात्त्विककडून पदकांची अपेक्षा

दोन ऑलिम्पिक पदकांची मानकरी पी.व्ही. सिंधू, लक्ष्य सेन आणि युवा आयुष शेट्टी एकेरीत हिंदुस्थानचे प्रमुख चेहरे आहेत. पुरुष दुहेरीत सात्त्विक साईराज, रांकीरेड्डी-चिराग शेट्टी यांच्याकडून पदकाची मोठी अपेक्षा आहे. हांगझोऊतील सुवर्णपदकाचा बचाव करण्याचे आव्हान या जोडीसमोर असेल.

हॉकीकबड्डी – सांघिक सुवर्णाची जबाबदारी

हॉकीत हरमनप्रीतसिंगच्या नेतृत्वाखाली पुरुष संघ, तर सलिमा टेटेच्या नेतृत्वाखाली महिला संघ मैदानात उतरेल. हरमनप्रीतसह हार्दिकसिंग, मनप्रीतसिंग आणि विवेक सागर प्रसाद यांच्यावर विशेष लक्ष असेल. कबड्डीत पवन सेहरावत, अस्लम इनामदार, आशू मलिक, अर्जुन देशवाल आणि कर्णधार सुनील कुमार पुरुष संघाचे प्रमुख चेहरे आहेत; महिलांमध्ये पुष्पा राणा नेतृत्व करणार आहे. दोन्ही संघ हांगझोऊतील सुवर्णपदकाचा बचाव करण्यासाठी उतरतील.

मनु, तेजिंदर ध्वजवाहक

आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात हिंदुस्थानी पथकाचे नेतृत्व करण्याचा मान दोन ऑलिम्पिक पदकविजेत्या मनु भाकर आणि दोन वेळा आशियाई सुवर्णपदक विजेता तेजिंदरपाल सिंह तूर यांना मिळाला आहे. 19 सप्टेंबर रोजी नागोया येथील पालोमा मिझुहो स्टेडियमवर होणाऱया उद्घाटन सोहळ्यात दोघेही हिंदुस्थानचा तिरंगा अभिमानाने फडकवतील.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 10 मीटर एअर पिस्तूल आणि मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकून मनु भाकरने इतिहास घडवला होता. एका ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी ती स्वतंत्र हिंदुस्थानातील पहिली महिला खेळाडू ठरली. दुसरीकडे, तूरने जकार्ता 2018 आणि हांगझोऊ 2023 आशियाई क्रीडा स्पर्धेत गोळाफेकीत सुवर्णपदक पटकावले आहे. आता सलग तिसऱया सुवर्णपदकाच्या निर्धाराने तो मैदानात उतरणार आहे. त्यामुळे उद्घाटन सोहळ्यात या दोन विजेत्यांच्या खांद्यावर तिरंगा असणे हे हिंदुस्थानी क्रीडा सामर्थ्याचे प्रतीक ठरणार आहे.