
गणपती दर्शनासाठी रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांच्या घरी गेल्याने शिंदे गटात प्रचंड धुसफूस सुरू झाली आहे. रायगड जिल्ह्यात शिंदे गट आणि अजित पवार राष्ट्रवादी गटात मोठा राजकीय संघर्ष सुरू आहे. अशा वेळी गोगावलेंनी तटकरेंच्या घरी जायला नको होते, अशी फणफण शिंदे गटाचे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी व्यक्त केली.
रायगड जिल्ह्यात खासदार सुनील तटकरे विरुद्ध शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले, महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे असा उभा वाद सुरू आहे. दोन्ही पक्षांचे लोकप्रतिनिधी एकमेकांची रोजच यथेच्छ उणीदुणी काढत आहेत. एकमेकांना टार्गेट करण्याची संधी दोन्ही गटाचे लोकप्रतिनिधी सोडत नाहीत. त्यातच विधान परिषद निवडणुकीनंतर हा वाद अधिकच चिघळला आहे. असे असतानाच पालकमंत्री भरत गोगावले यांनी सुनील तटकरे यांच्या सुताखाडी येथील गीताबाग निवासस्थानी जाऊन गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर शिंदे गटाचे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांचे डोके भणभणले.
तटकरे गोगावलेंच्या घरी जातील का?
गोगावले यांना पालकमंत्रीपद मिळवण्यात तटकरे यांचे कोणतेही योगदान नाही. तटकरे सातत्याने शिंदे गटाविरोधात कुरघोड्या करतात. अशा वेळी गोगावलेंनी तटकरेंच्या घरी जाणे टाळायला हवे होते. तटकरे गोगावलेंच्या घरी जातील का? असा थयथयाट महेंद्र दळवी यांनी पत्रकार परिषद घेऊन केला.
































































