
पाण्याचा प्रेशर असह्य झाल्याने भाईंदरमधील गोडदेव गाव परिसरात आज सूर्या प्रकल्पाच्या जलवाहिनीचा स्फोट झाला. त्यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र दगड व डांबराचे तुकडे हवेत फेकले गेले. स्फोटाच्या आवाजाने गोडदेव भागातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. कंत्राटदाराने सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना न केल्यानेच ही घटना घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
मीरा-भाईंदर शहराची पाण्याची गरज भागविण्यासाठी सूर्या प्रकल्पातून पाणी आणण्याच्या दृष्टीने विविध ठिकाणी पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. सुमारे दोन महिन्यांपूर्वी याच ठिकाणी पाइपलाइन टाकण्यात आली होती. त्यानंतर पाइपलाइनच्या टेस्टिंगचे काम सुरू असताना अचानक पाइपलाइनमध्ये मोठ्या दाबाने पाणी सोडण्यात आले आणि काही क्षणांतच पाइपलाइन फुटली. पाइपलाइन फुटताच पाण्याचा प्रचंड फवारा उडाला. पाण्याच्या अतिउच्च दाबामुळे जमिनीतील दगड, माती आणि डांबराचे तुकडे हवेत फेकले गेले. हे तुकडे रस्त्यावर तसेच आजूबाजूच्या परिसरात जाऊन पडले.
तर मोठी दुर्घटना घडली असती
भाईंदर पूर्वेच्या गोडदेव गाव परिसरातील बनाना लिफ हॉटेलसमोर सूर्या प्रकल्पाच्या पाइपलाइनचा स्फोट झाला. याच भागात नेहमी वाहनांची ये जा सुरू असते. स्फोटानंतर पाण्याचा मोठा फवारा उडाला. तसेच दगडगोटेही फेकले गेले. एखादा दगड किंवा डांबराचा मोठा तुकडा वाहनचालक अथवा पादचाऱ्याला लागला असता तर मोठी दुर्घटना घडली असती.




























































