स्पायनल मस्क्युलर ॲट्रॉफीशी लढणाऱ्या चिमुकल्या गार्गीला वाचवा…, हिंदुजा रुग्णालयात उपचाराचा खर्च १० कोटी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुण्याच्या वाघोलीत राहणाऱ्या गार्गी संजय जाधव या अवघ्या चौदा महिन्यांच्या चिमुकलीचा स्पायनल मस्क्युलर ॲट्रॉफी या गंभीर आजाराशी लढा सुरू आहे. मुंबईतील पी.डी. हिंदुजा रुग्णालयाने तिला वाचवण्यासाठी झोलजेसमा जनुक उपचार पद्धती अर्थात जीन थेरपी सुचवली आहे. या उपचाराचा खर्च सुमारे दहा कोटी रुपये असल्याने तिच्या कुटुंबाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. चिमुकल्या गार्गीला जीवनदान देण्यासाठी खोपोलीतील एक कॉलेज तरुण सनी जंगम याने गावागावात वारी सुरू केली असून त्याने आजवर चार लाख रुपयांची मदत गोळा केली आहे.

मदतीसाठी सनी जंगमची गावागावांत वारी (पायाला भिंगरी लावून २२ दिवसांत २२ गावे पालथी): 

गार्गीची ही व्यथा खोपोलीतील कॉलेज तरुण सनी जंगम याला सोशल मीडियावरून कळली. त्याने गार्गीचे वडील संजय जाधव यांच्याशी पुण्यात जाऊन संपर्क केला आणि मला जितके पैसे उभे करता येतील तेवढे करेन, असा शब्द देऊन तो खोपोलीत परतला.

त्यानंतर गार्गीचे छायाचित्र असलेला एक फलक घेऊन तो रोज एक गाव याप्रमाणे मदत गोळा करण्यासाठी फिरस्ती करत आहे.

गेल्या २२ दिवसांत सनीने २२ गावे पायाला भिंगरी लावून पालथी घातली आहेत. या फिरस्तीतून त्याने तब्बल चार लाख रुपयांचा मदतनिधी गोळा केला आहे.

एका चिमुकलीच्या जिवासाठी तुमची छोटीशी मदत तिच्या उपचारासाठी मोठी ठरेल, अशी भावनिक साद सनीने घातल्यानंतर गावागावांतून त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

गार्गीला जीवनदान देण्यासाठी तुमचा खारीचा वाटा उचला:

वाघोलीतील संजय जाधव यांची गार्गी ही अवघी चौदा महिन्यांची मुलगी आहे. चौदा महिने होऊनही तिची हालचाल अत्यंत मंद होती. मान स्थिर न राहणे, उभे राहता न येणे अशा अनेक अडचणी दिसू लागल्यावर तिच्या पालकांनी तिला पुण्यातील केईएम रुग्णालयात उपचारासाठी नेले.

गार्गीवर मुंबईतील पी.डी. हिंदुजा रुग्णालयातच योग्य उपचार होतील असे डॉक्टरांनी सांगितले. त्यानुसार गार्गीच्या पालकांनी तिला घेऊन हिंदुजा रुग्णालय गाठले. तिची संपूर्ण तपासणी केल्यानंतर तिला स्पायनल मस्क्युलर ॲट्रॉफी हा गंभीर आजार असल्याचे निदान झाले. उपचारासाठी दहा कोटी रुपये खर्च येणार असल्याचे कळल्यानंतर वडील संजय जाधव यांना धक्का बसला.

संजय जाधव हे पुण्यातील एका कंपनीत काम करतात. अल्प पगारामुळे इतका मोठा खर्च करणे आवाक्याबाहेर होते. मात्र मुलीला वाचवण्यासाठी ते हिम्मत हरले नाहीत. त्यांनी गार्गीचे सोशल मीडिया पेज बनवून मदतीचे आवाहन केले आणि क्राउड फंडिंगच्या माध्यमातून जनता जनार्दनाकडून त्यांना भरभरून प्रतिसाद मिळाला.

आजवर गार्गीसाठी ६ कोटी ७० लाखांचा निधी उभा राहिला आहे. अजून ३ कोटी ३० लाखांचा निधी त्यांना उभा करायचा आहे.

संपर्क: चिमुकल्या गार्गीला जीवनदान देण्यासाठी तिच्या वडिलांशी ९९२१९८७४६८ या क्रमांकावर संपर्क साधून तुमचा खारीचा वाटा उचला.