
शेतकऱ्यांच्या शेतात दुष्काळाचे चटके, पिकांची राखरांगोळी आणि कर्जाचा डोंगर, तर सरकारच्या दुष्काळ आढावा बैठकीत काजू-बदामाची मेजवानी! या विसंगतीवर किसान सभेने संतापाचा आसूड ओढला आहे. ‘शेतकऱ्यांच्या जखमेवर काजू-बदामाचा मलम चोळणार का, असा थेट सवाल करीत अकोले शहरात किसान सभेने आक्रमक आंदोलन केले. अकोले शहरात निघालेल्या मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी मंत्र्यांना काजू-बदाम पाठवून सरकारच्या कारभाराचा निषेध करण्यात आला.
महाराष्ट्रातील शेतकरी संकटात असताना केवळ बैठका, पाहणी आणि आश्वासनांचा पाऊस कशासाठी, असा सवाल किसान सभेने उपस्थित केला आहे. राज्यात दुष्काळ जाहीर करा, ‘एनडीआरएफ’च्या निकषांचा घोळ न घालता पिकांची संपूर्ण नुकसानभरपाई द्या, नियमित कर्जदारांना किमान दोन लाख रुपयांचे प्रोत्साहन अनुदान द्या आणि कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ द्या, अशा मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन छेडण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून अकोले शहरात किसान सभेने अकोले शहरात मोर्चा काढून सरकारला धारेवर धरले. मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे यांना निवेदनासोबत काजू-बदामाचे पाकीटही देण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर निर्णय घेण्याऐवजी कागदी घोडे नाचविण्याचा उद्योग सुरू राहणार असेल तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
शेतकऱ्यांबरोबरच्या बैठकीबाबत घूमजाव
नियमित कर्जदार आणि दुष्काळाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री यांच्यासोबत किसान सभेच्या शिष्टमंडळाची बैठक घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, महसूलमंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी आश्वासन देऊनही बैठक अद्याप झालेली नसल्याचा आरोप किसान सभेने केला आहे.
वर्षा बंगल्यावर काजू, बदाम ओतणार
सरकारने या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेतली नाही, तर पुढील टप्प्यात वर्षा बंगल्यावर काजू-बदाम ओतण्याचे आंदोलन केले जाईल, असा इशारा डॉ. अशोक ढवळे, जे. पी. गावीत, डॉ. अजित नवले आणि उमेश देशमुख यांनी दिला आहे. आता प्रश्न काजू-बदामाचा नाही, तर प्रश्न शेतकऱ्याच्या घामाचा आणि त्याच्या जगण्याचा आहे, असा संतप्त सूर आंदोलनातून उमटला.































































