
अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगरातील रेल्वे प्रवाशांना आता संकटाच्या काळात तातडीची मदत मिळणार आहे. या रेल्वे मार्गावरील प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित व्हावा यासाठी अंबरनाथमध्ये नव्या लोहमार्ग पोलीस ठाण्याचे उद्घाटन लोहमार्ग पोलीस महासंचालक प्रशांत बुरडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर उभारण्यात आलेल्या या पोलीस ठाण्यामुळे कल्याण लोहमार्ग पोलिसांचा ताण कमी होणार आहे.
कल्याण-कर्जत रेल्वे मार्गावर यापूर्वी कल्याण आणि कर्जत असे दोन लोहमार्ग पोलीस ठाणे असल्यामुळे अंबरनाथ किंवा बदलापूर स्थानकांवर मोबाईल चोरी, पाकीटमारी किंवा कोणतीही अनुचित घटना घडल्यास प्रवाशांना तक्रार नोंदवण्यासाठी थेट कल्याण गाठावे लागत होते. त्यामुळे प्रवाशांचा बहुमूल्य वेळ वाया जात होता, शिवाय त्यांना मानसिक त्रासालाही सामोरे जावे लागत होते. आता अंबरनाथ रेल्वे स्थानकावर लोहमार्ग पोलीस ठाणे सुरू झाल्यामुळे कल्याण रेल्वे पोलिसांवरील कामाचा ताण मोठ्या प्रमाणावर कमी होईल.
या लोकार्पण सोहळ्यात मध्य रेल्वेचे डीआरएम हिरेश मीना, रेल्वे सुरक्षा बलाचे मुख्य आयुक्त विवेक सागर, अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव, पोलीस आयुक्त राकेश कलासागर, पोलीस उपायुक्त सुनीता साळुंखे-ठाकरे, पोलीस उपायुक्त प्रज्ञाेडगे, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त राहुल राज, सहाय्यक पोलीस आयुक्त नीलिमा कुलकर्णी, पोलीस उपायुक्त सचिन गोरे, अंबरनाथ पालिकेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड, अंबरनाथ लोहमार्ग पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण चव्हाण, अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि अधिकारी मान्यवर उपस्थित होते.
अंबरनाथ लोहमार्ग पोलीस ठाण्यांतर्गत उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर असे तीन रेल्वे स्थानक असणार आहेत.
नव्या रेल्वे पोलीस ठाण्यात अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सुसज्ज अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
रेल्वे गाड्यांमधील आणि स्थानकांनावरील वाढती गर्दी, महिला प्रवाशांची सुरक्षा आणि चोऱ्यांच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी हे पोलीस ठाणे तत्परतेने काम करेल.



























































