
मुंबईत पावसाने पुन्हा जोर धरल्यानंतर शहर आणि उपनगरातील अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यामुळे गणेश विसर्जनाच्या मार्गांवर विघ्न निर्माण झाले आहे. विसर्जनापूर्वी शहर आणि उपनगरातील रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजविण्याचे आदेश पालिका प्रशासनाने विभाग कार्यालयांना दिले आहेत. विशेषतः गणेश विसर्जन मिरवणुकीचे मार्ग, प्रमुख रस्ते, चौक तसेच विसर्जनस्थळांकडे जाणाऱया मार्गांची पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
विसर्जनाच्या दिवशी मोठय़ा प्रमाणात वाहतूक आणि गर्दी होणार असल्याने खड्डय़ांमुळे वाहतूककाsंडी तसेच दुचाकीस्वारांच्या अपघाताचा धोका वाढू शकतो. त्यामुळे संबंधित विभाग कार्यालयांनी रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी करून खड्डे बुजविण्याचे काम वेळेत पूर्ण करावे, तसेच दुरुस्ती केलेल्या रस्त्यांची पुन्हा तपासणी करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
पावसामुळे डांबरी रस्ते खराब झाले आहेत. अनेक ठिकाणी पुन्हा खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी आधी बुजविण्यात आलेले खड्डेही पुन्हा उघडले आहेत. त्यामुळे पालिकेच्या कामाच्या गुणवत्तेवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत.
पावसाळय़ात दरवर्षी खड्डय़ांचा प्रश्न ऐरणीवर येत असताना यंदाही विसर्जनाच्या तोंडावर खड्डय़ांचे विघ्न अधूनमधून पडणाऱया पावसाने निर्माण झाले आहे. त्यामुळे पालिकेची खड्डे बुजवण्यासाठी धावपळ उडाली आहे.




























































