
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात बुधवारी सलग दुसऱया दिवशी सुनावणी होऊ शकली नाही. इतर प्रकरणांच्या सुनावणीमध्ये न्यायालयीन कामकाजाची वेळ संपली. त्यामुळे न्यायालयाने आता शिवसेनेच्या प्रकरणाला गुरुवारची ‘तारीख’ दिली. जवळपास साडेतीन वर्षे प्रलंबित असलेला हा खटला अंतिम टप्प्यात पोहोचला असल्याने सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मूळ शिवसेनेशी गद्दारी केलेल्या शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह देणाऱया केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोथात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी याचिका दाखल केली आहे. याचिकेवर सरन्यायाधीश सूर्य कांत, न्यायमूर्ती जॉयमल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठापुढे सध्या सुनावणी अंतिम सुनावणी सुरू आहे. गेल्या महिन्यात उद्धव ठाकरे यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांनी जोरदार युक्तिवाद केला. त्यामुळे प्रकरण निर्णायक वळणावर पोहोचले आहे. शिवसेनेच्या भक्कम दाव्यांवर शिंदे गटातर्फे अॅड. नीरज किशन काwल हे बाजू मांडत आहेत. त्यांच्या युक्तिवादावेळी न्यायालयाने प्रश्नांचा भडिमार केला. त्यानंतर सलग दोन दिवस सुनावणी होऊ शकलेली नाही. आता गुरुवारी न्यायालयात काय घडते, याकडे राजकीय वर्तुळासह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

























































