
पश्चिम बंगालमधील नंदीग्राम विधानसभा मतदारसंघात 6 ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. मात्र, निवडणुकीपूर्वीच या मतदारसंघात राजकीय संघर्षाला सुरुवात झाली आहे. काँग्रेसच्या उमेदवाराला अटक झाल्यानंतर आता काँग्रेसने भाजपच्या उमेदवार हसीरानी रथ यांच्या विरोधात कलकत्ता उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. रथ यांच्या प्रतिज्ञापत्रातील वय आणि शैक्षणिक पात्रतेची माहिती परस्परविरोधी असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
काँग्रेसच्या वतीने ज्येष्ठ वकील रिट्झी घोषाल यांनी ही याचिका दाखल केली आहे. हसीरानी रथ यांनी प्रतिज्ञापत्रात दिलेली वय आणि शैक्षणिक पात्रतेची माहिती परस्परविरोधी असून, ती व्यावहारिकदृष्ट्या अशक्य असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. या याचिकेवर गुरुवारी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
काय आहे काँग्रेसचा आरोप?
काँग्रेसच्या म्हणण्यानुसार, हसीरानी रथ यांनी प्रतिज्ञापत्रात आपले वय 60 वर्षांपेक्षा अधिक असल्याचे नमूद केले आहे. त्यानुसार त्यांचा जन्म साधारण 1965 किंवा 1966च्या आसपास झालेला असावा. मात्र, त्याच प्रतिज्ञापत्रात त्यांनी 1965 मध्ये माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण केल्याची माहिती दिली आहे.
न्यायालयातील युक्तिवादादरम्यान रिट्झी घोषाल यांनी याच मुद्द्याकडे लक्ष वेधले. जर उमेदवाराचा जन्म 1965 किंवा 1966 मध्ये झाला असेल, तर 1965 मध्ये त्यांनी माध्यमिक परीक्षा कशी उत्तीर्ण केली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. वय आणि शिक्षणासंदर्भातील ही माहिती ‘व्यावहारिकदृष्ट्या अशक्य’ असल्याचा दावा घोषाल यांनी केला.
काँग्रेसने हसीरानी रथ यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच निवडणूक आयोगाने प्रतिज्ञापत्राची तपासणी करूनही याबाबत कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
उमेदवारी रद्द करण्याची मागणी
न्यायमूर्ती कृष्णा राव यांनी याचिकाकर्त्याला कोणता दिलासा हवा आहे, असा प्रश्न विचारला. त्यावर रिट्झी घोषाल यांनी भाजप उमेदवार हसीरानी रथ यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्याची मागणी केली.
न्यायालयाने याचिका स्वीकारली असून, या प्रकरणावर गुरुवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.
प्रतिज्ञापत्रात नेमके काय नमूद?
हसीरानी रथ यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात वय 60 वर्षांपेक्षा अधिक असल्याचे नमूद केले आहे. मात्र, त्यात जन्मतारीख दिलेली नाही.
त्याच प्रतिज्ञापत्रात त्यांनी 1965 मध्ये चौखली गंगा-पद्मा मिलन कन्या विद्यापीठात दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे 60 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या हिशेबाने 1965 किंवा 1966 मध्ये जन्मलेल्या व्यक्तीने 1965 मध्ये दहावीचे शिक्षण कसे घेतले, असा प्रश्न काँग्रेसने उपस्थित केला आहे.
कोण आहेत हसीरानी रथ?
हसीरानी रथ या पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांचे माजी स्वीय सहाय्यक चंद्रनाथ रथ यांच्या आई आहेत. याच वर्षी मे महिन्यात उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील मध्यमग्राम येथे चंद्रनाथ रथ यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
भाजपने आरोप फेटाळले
काँग्रेसने केलेले आरोप भाजपने फेटाळून लावले आहेत. हे आरोप आपल्या उमेदवाराची प्रतिमा खराब करण्याच्या उद्देशाने करण्यात आल्याचा दावा भाजपने केला आहे.
नंदीग्राम पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवाराच्या प्रतिज्ञापत्रातील माहितीवरून निर्माण झालेल्या या वादामुळे आता गुरुवारी होणाऱ्या कलकत्ता उच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे लक्ष लागले आहे.



























































