
गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दिलेल्या ओढीमुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. सोयाबीन, कापूस आणि तूर या पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. जिल्ह्यात त्वरित कोरडा दुष्काळ जाहीर करून बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत द्यावी, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.
यवतमाळ येथील ऐतिहासिक आझाद मैदानावरून निघालेला हा मोर्चा पाच कंदील चौक आणि संविधान चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चात हजारोच्या संख्येने शेतकरी आणि शिवसैनिक सहभागी झाले होते. दुपारच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर झालेल्या सभेत आमदार नितीन देशमुख यांनी सरकारवर निशाणा साधला. महामार्गालगतची पाहणी सोडून बांधावर या असे आव्हानच नितीन देशमुख यांनी दिले.
केवळ महामार्गालगतची शेती पाहून शेतकऱ्यांची खरी परिस्थिती समजणार नाही. यवतमाळच्या दुर्गम व आदिवासी भागातील शेतात जाऊन वस्तुस्थिती पाहा. शेतकऱ्यांच्या बांधावर मुक्काम करा आणि त्यांचे वास्तव दु:ख अनुभवा, असे नितीन देशमुख म्हणाले. तसेच भाजपच्या काळात शेतकरी अधिक अडचणीत आल्याचा आरोप करत, महाविकास आघाडीच्या काळात मोठा शेतकरी असलेला वर्ग आज अल्पभूधारक बनला असून भविष्यात शेती टिकवणे कठीण होईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. जर खासदार विकासासाठी केंद्रात गेले असतील आणि तरीही शेतकऱ्यांना मदत मिळत नसेल, तर त्यांनी राजीनामा देऊन शेतकऱ्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरले पाहिजे, असा टोलाही देशमुख यांनी लगावला.
शेतकरी संकटात, तर सरकार कुंभमेळ्यात व्यस्त – राजेंद्र गायकवाड
राज्यात सर्वत्र कोरड्या दुष्काळाची छाया असताना सरकारचे लक्ष शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे नसून कुंभमेळ्याच्या नियोजनावरच अधिक केंद्रित असल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी केला. कुंभमेळ्यासाठी होणाऱ्या हजारो कोटींच्या खर्चातील काही भाग जरी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी वापरला, तर बळीराजाला मोठा दिलासा मिळेल. शेतकरी जगला तरच देश जगेल, असे ते यावेळी म्हणाले.
या आंदोलनात आमदार संजय देरकर, लोकसभा संपर्कप्रमुख दिलीप जाधव, जिल्हाप्रमुख प्रवीण शिंदे, किशोर इंगळे, संजय निखाडे, बाबू पाटील जैत, सागर पुरी, कल्पना दरवई, तुषार देशमुख, चंद्रकांत उडाके, निलेश लडके, चेतन शिरसाट, राजेंद्र कोहरे आणि युवासेना जिल्हाप्रमुख गिरीजानंद कळंबे यांच्यासह अनिकेत आडे, प्रवीण पवार, शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मोर्चातील प्रमुख मागण्या –
- जिल्ह्यात तत्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करून बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची भरपाई द्यावी.
- पीकविमा योजनेतील रद्द केलेले चारही ‘ट्रिगर’ पूर्ववत लागू करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी.
- आगामी रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना बियाणे आणि खते मोफत पुरवण्यात यावीत.
- शेतीकामासाठी अखंडित २४ तास वीजपुरवठा करण्यात यावा.


























































