नेपाळमध्ये पावसाचा कहर; ७२ तासांत १४ जणांचा मृत्यू, अनेक ठिकाणी भूस्खलन आणि पूरस्थिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नेपाळमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. संततधार पावसामुळे आलेले पूर आणि ठिकठिकाणी झालेल्या भूस्खलनाच्या घटनांमध्ये गेल्या ७२ तासांत किमान १४ जणांचा मृत्यू झाला आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रशासनाने देशभरात सतर्कतेचा इशारा दिला आहे.

रविवारी सकाळी नेपाळमधील नारायणी नदीने ९ मीटरची धोक्याची पातळी ओलांडल्याने, नदीकाठच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाली. यानंतर प्रशासनाने नदीकाठी राहणाऱ्या सर्व नागरिकांसाठी तातडीचा इशारा जारी केला आहे.

देशभरात प्रवासासाठी महत्त्वाचा दुवा मानल्या जाणाऱ्या चितवनकडे जाणारे महामार्ग अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्यामुळे पूर्णपणे बंद झाले आहेत. तसेच बागलुंग जिल्ह्यातून वाहणाऱ्या कालीगंडकी नदीने अनेक घरे आणि पूल वाहून नेले असून, रस्ते संपर्कही तुटला आहे.

बचावकार्यात अडथळे

सतत कोसळणारा पाऊस आणि ठिकठिकाणी होणाऱ्या भूस्खलनामुळे शोध आणि बचावकार्यात मोठे अडथळे येत आहेत. असे असले तरी, सुरक्षा दले अनेक जिल्ह्यांमध्ये पूर आणि पाणी साचण्याच्या धोक्यामुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम युद्धपातळीवर करत आहेत. आतापर्यंत हजारो लोकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे.