
नवी मुंबईतील बेलापूर खिंडीत एसटीने 5 ते 6 वाहनांना धडक दिल्याची घटना रविवारी घडली. एसटीचा ब्रेक फेल झाल्याने ही घटना घडली. या अपघात 5 ते 6 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त एसटी मुंबई सेंट्रल डेपोतून मुरुडला चालली होती. सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास एसटी बेलापूर खिंडीत आली असता तिचे ब्रेकफेल झाले. एसटी चालकाच्या ही बाब लक्षात येताच त्याने वाहन कंट्रोल करण्यासाठी शेजारील फुटपाथच्या अडथळ्याचा आधार घेत एसटी कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र या मार्गावर तीव्र उतार असल्याने गाडीवर नियंत्रण मिळवता आले नाही.
गाडीवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात सदरच्या एसटीने तीन रिक्षा आणि तीन चारचाकी अशा सहा वाहनांना धडक दिली. यात रिक्षातील 5 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.






















































