
हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यात रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे मालिंग नाला परिसरात दरडी कोसळल्या. दरडींमुळे चिखलाचा प्रवाह रस्त्यावर आल्याने राष्ट्रीय महामार्ग-5 (NH-05) वरील वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे शेकडो वाहने अडकून पडली आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
जिल्हा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सततच्या पावसामुळे महामार्गाच्या चौरा-सामडो पट्ट्यात दरडी कोसळण्याच्या आणि चिखलाचा प्रवाह येण्याच्या घटना घडल्या, ज्यामुळे रस्ता बंद करावा लागला, असे इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
वाहतूक पूर्ववत करण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची पथके बाधित ठिकाणी तैनात करण्यात आली आहेत. चिखल साफ करण्यासाठी आणि टापरीजवळ रस्त्यावर अडकलेली वाहने हटवण्यासाठी घटनास्थळी यंत्रसामग्री तैनात करण्यात आली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
किन्नौरमध्ये या हंगामातील पहिली हिमवृष्टी झाली आहे. कुनोचरंग-चितकुल (Koonochrang-Chitkul) भागात झालेल्या हिमवृष्टीमुळे सफरचंदाच्या पिकांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. हवामान विभागाने हिमाचल प्रदेशच्या पर्वतीय हिमवृष्टीचा, तसेच राज्याच्या मध्यम व सखल डोंगराळ भागात आणि मैदानी प्रदेशात पावसाचा इशारा दिला आहे. राज्यात 29 सप्टेंबरपर्यंत पाऊस सुरू राहील आणि त्यानंतर 3 ऑक्टोबरपर्यंत हवामान कोरडे राहील, असे हवामान विभागाने म्हटले आहे.



























































