विराट-गिलचा ‘शतकी शो’, पहिल्याच सामन्यात विंडीजची दाणादाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वेस्ट इंडीजने दिलेले 295 धावांचे आव्हान… पण विराट कोहली आणि शुभमन गिल यांच्या शतकी तडाख्यापुढे हे आव्हान क्षणार्धात फिके पडले. विराटच्या नाबाद 139 आणि कर्णधार गिलच्या 110 धावांच्या वादळी खेळीच्या जोरावर हिंदुस्थानने पहिल्या वनडेत वेस्ट इंडीजचा आठ विकेट राखून धुव्वा उडवला. तीन सामन्यांच्या मालिकेत हिंदुस्थानने 1-0 अशी आघाडी घेतली.

विराटचा विक्रमांचा धडाका

विराट कोहली पुन्हा एकदा विक्रमांच्या केंद्रस्थानी राहिला. त्याने नाबाद 139 धावांची झंझावाती खेळी करत वनडेतील 55वे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 86वे शतक ठोकले. त्याने ही खेळी 88 चेंडूंत 9 षटकार आणि 10 चौकारांसह साकारली.  त्याहून महत्त्वाचे म्हणजे, वनडेमध्ये सर्वात वेगाने 15 हजार धावांचा टप्पा गाठण्याचा विक्रम त्याने आपल्या नावावर केला. विराटने अवघ्या 303 डावांत हा पराक्रम केला. यापूर्वी सचिन तेंडुलकरने 377 डावांत हा टप्पा गाठला होता.

गिलचाही शतकी तडाखा

विराटच्या सोबतीला कर्णधार शुभमन गिलही तितक्याच ताकदीने उभा राहिला. गिलने 110 धावांची झंझावाती खेळी करत वनडे कारकिर्दीतील दहावे शतक झळकवले. दोन्ही फलंदाजांनी विंडीजच्या गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली. दोघांनी 151 धावांची भागी रचली. सलामीला रोहित शर्माने 32 धावा करताना सलामीवीर म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही आपल्या नावावर केला.

पुलदीपचा फिरकीचा पंजा

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडीजने 7 बाद 295 धावा केल्या. जस्टिन ग्रीव्हजने 101 धावांची शतकी खेळी केली. जॉन कॅम्पबेलने 62, तर अमीर जांगूने नाबाद 58 धावा केल्या. हिंदुस्थानकडून पुलदीप यादवने चार विकेट घेत विंडीजच्या धावांना लगाम घातला. प्रसिध पृष्णाने दोन, तर नितीश रेड्डीने एक विकेट टिपला.