
हिवाळ्याची चाहूल लागली की त्वचा कोरडी पडणे, तिला तडे जाणे आणि त्वचा खरखरीत होणे ही समस्या सामान्यपणे दिसून येते. अशा वेळी त्वचा मऊ ठेवण्यासाठी घरच्या घरी नैसर्गिक लोशन किंवा क्रीम तयार करता येते. हवामान बदलताच वातावरणातील आर्द्रता कमी होऊ लागते. याचा थेट परिणाम त्वचेवर होतो. चेहरा, हात आणि पायांची त्वचा ताणल्यासारखी वाटणे, कोरडी पडणे किंवा तडे जाणे या समस्या जाणवू शकतात.
यासाठी बाजारातील महागड्या सौंदर्यप्रसाधनांवर पैसे खर्च करण्याऐवजी घरच्या घरी शिया बटर क्रीम तयार करता येते. यासाठी काही नैसर्गिक पदार्थांची गरज असते.
साहित्य
अर्धा कप अनरिफाइंड शिया बटर
२ मोठे चमचे शुद्ध नारळाचे तेल किंवा बदामाचे तेल
१ छोटा चमचा अॅलोव्हेरा जेल
४ ते ५ थेंब आवडीनुसार इसेन्शियल ऑइल, जसे लॅव्हेंडर किंवा गुलाब
क्रीम तयार करण्याची पद्धत
एका भांड्यात शिया बटर आणि नारळाचे किंवा बदामाचे तेल घ्यावे. डबल बॉयलर पद्धतीने म्हणजे गरम पाण्याच्या भांड्यावर दुसरे भांडे ठेवून हे मिश्रण मंद आचेवर २ ते ३ मिनिटे हलके वितळवावे.
बटर पूर्णपणे वितळल्यानंतर ते गॅसवरून उतरवावे. त्यानंतर हे भांडे १५ ते २० मिनिटांसाठी फ्रीजरमध्ये ठेवावे, जेणेकरून मिश्रण अर्धवट घट्ट होईल.
फ्रीजरमधून भांडे बाहेर काढल्यानंतर त्यात एक चमचा अॅलोव्हेरा जेल आणि इसेन्शियल ऑइल घालावे.
यानंतर हँड बीटर, इलेक्ट्रिक व्हिस्कर किंवा काट्याच्या मदतीने हे मिश्रण ४ ते ५ मिनिटे फेटावे. हळूहळू त्याचा रंग पांढरा होईल आणि पोत व्हीप्ड आईस्क्रीम किंवा क्रीमसारखा हलका आणि मऊ होईल.
तयार क्रीम स्वच्छ आणि कोरड्या काचेच्या बरणीत भरून ठेवता येते.
आंघोळीनंतर किंवा रात्री झोपण्यापूर्वी ही क्रीम चेहरा, हात, कोपर आणि पायांवर लावता येते. मात्र, संवेदनशील त्वचा असल्यास वापरण्यापूर्वी छोट्या भागावर त्याची चाचणी करणे योग्य ठरेल.























































