
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या भोंगळ कारभाराविरोधात, परीक्षांमधील गैरव्यवहार आणि रखडलेल्या भरतीप्रक्रियेविरुद्ध पुण्यातील स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी सुरू केलेले आंदोलन आता अत्यंत तीव्र वळणावर पोहोचले आहे. महात्मा गांधी जयंतीदिनी हजारो विद्यार्थ्यांनी पुण्यात आंदोलनाचे रणशिंग फुंकले असून, या आंदोलकांना राजकीय नेत्यांनी पाठिंबा दर्शवीला आहे.
विद्यार्थ्यांचा रोष शांत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाशी चर्चा करून आंदोलन स्थगित करण्याचे आवाहन केले होते. याशिवाय ड्रग्ज इन्स्पेक्टर पेपरफुटी प्रकरणात दोषी ठरवत आयोगाचे सचिव महेंद्र हरपाळकर यांची तात्काळ उचलबांगडीही करण्यात आली. मात्र, आंदोलक विद्यार्थी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. अगदी शिपायापासून ते अध्यक्षांपर्यंत गंभीर पुरावे दिल्यानंतरही मुख्यमंत्री आयोगाच्या अध्यक्षांना पाठीशी का घालत आहेत? असा संतप्त सवाल विद्यार्थी विचारत आहेत, जोपर्यंत अध्यक्षांचा राजीनामा घेतला जात नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा निर्धार विद्यार्थ्यांनी केला आहे. या संदर्भात विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने ज्येष्ठ नेते शरद पवार यांचीही भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले.
आंदोलनाच्या सलग पाचव्या दिवशी विद्यार्थ्यांनी आंदोलनस्थळी प्रचंड गर्दी करून घोषणाबाजी केली. विद्यार्थ्यांनी प्रतिकात्मक तिरडी काढून सरकारचा जाहीर निषेध केला. आंदोलनस्थळी असलेल्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत विद्यार्थी आपल्या विविध मागण्यासाठी एसएम जोशी पुलावर ठिय्या धरून बसले होते.
हे आंदोलन सरकारला महागात पडणार – रोहित पवार
राजकारणात पिसाळलेले कुत्रे असतात, ते इकडे चाव तिकडे चाव असं करतात, त्यामुळे त्यांच्यावर बोलून आम्ही खालच्या पातळीवर कशाला जाऊ. मुख्यमंत्री यांना विद्यार्थ्यांनी मागणीचा प्रस्ताव दिलेला आहे. त्यामुळे मध्येच या राजकीय पिसाळलेल्या कुत्र्याबद्दल आम्ही बोललो तर विषयांतर होईल. हे विद्यार्थ्यांचे आंदोलन असल्यामुळे आम्ही स्वतःहून आलो. हे आंदोलन महत्त्वाचं आणि प्रामाणिक आहे. भाजपमधील राजकीय पुढाऱ्यांनी विद्यार्थीहीत लक्षात घ्यावं. उद्या मंत्रिमंडळाची बैठक आहे.जर सरकार मार्ग काढणार नसेल तर संविधानाच्या मार्गाने आम्ही आंदोलन तीव्र करू. हे आंदोलन सरकारला महागात पडेल, असा इशारा आमदार रोहित पवार यांनी माध्यमाशी बोलताना दिला.मला स्वतः ला अधिकारी बनायचं नाही, माझा मुलगा आणि मुलीलाही अधिकारी बनायचं नाही. पण माझं एमपीएससीशी देणंघेणं इतपंच की महाराष्ट्राचा नागरिक आहे. पैसे देऊन जेव्हा एखादा विद्यार्थी अधिकारी बनतो, आणि सेवेत जातो. पैसे देऊन अधिकारी झालेले लोकांना सेवा देत नाहीत. त्यामुळे जर हे भ्रष्ट अधिकारी सेवा देऊ शकत नाही ते आम्हाला व्यवस्थेत नको. एमपीएससीचं शुद्धीकरण व्हावं अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे त्याला आमचा पाठिंबा आहे, असेही रोहित पवार म्हणाले.
विद्यार्थ्यांनी आरपारची लढाई लढावी ः मनोज जरांगे—पाटील
‘एमपीएससी’च्या आंदोलनात विद्यार्थ्यांवर अन्याय होत राहिला आणि सरकारने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले, तर विद्यार्थ्यांच्या पाठिशी उभे राहून संपूर्ण महाराष्ट्र बंद करू. तुम्ही आवाज द्या, महाराष्ट्र बंद करून दाखवतो. महाराष्ट्रात चाक फिरू देणार नाही,’ असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे- पाटील यांनी दिला.
























































