
>> दिव्या सौदागर
[email protected]
रिलेशनशिप ओसीडी म्हणजेच ROCD ज्यामध्ये व्यक्ती ही तिच्या नात्यातील दुसऱया व्यक्तीच्या कमतरतेवर कायम पराकोटीचं लक्ष ठेवते आणि त्याबद्दल ताण आणि चिंतेचा सामना करत राहते. अशी व्यक्ती कायम अनिश्चितता आणि अतिविचारांच्या जाळ्यात इतकी अडकत जाते की त्यातून तिला समोरच्या व्यक्तीत कायम दोष दिसायला लागतात.
प्रज्ञा आणि सागर (दोघांची नावे बदलली आहेत) यांचं लग्न ठरून जवळपास दोनेक महिने झालेले. मेमध्ये लग्नाची तारीख जशी ठरली तशी दोघांच्याही घरी लगबग सुरू झाली. दोघांच्याही घरी उत्साहाचं वातावरण होतं. सागरच्या आईला तर विशेष आनंद झाला होता, कारण डझनावारी स्थळं बघितल्यानंतर तो प्रज्ञाच्या स्थळावर स्थिर झाला होता. म्हणजे प्रज्ञा आवडली होती का?
‘मलाच कळत नाहीये. म्हणून मी तुमच्याकडे आलोय.’ समुपदेशनाला आलेला सागर भलंमोठं प्रश्नचिन्ह घेऊन बोलत होता. ‘मॅम, त्याच्या अशा बोलण्याकडे आम्ही लक्ष देऊन वैतागलोय. त्याच्या अशाच किस काढण्याच्या स्वभावामुळे याआधीही काही चांगली स्थळं आमच्या हातून निघून गेली आहेत. आता प्रज्ञाच्या स्थळाआधी आम्ही त्याला भरपूर समजावलंय, ओरडलोयच म्हणा ना. त्यामुळे त्याने तिला पसंत केली. आणि आता?’ बोलता बोलता सागरच्या आईचा गळा भरून आला. तिची चिडचिड उगाचच नव्हती. कारण सागरच्या अशा खुसपटं काढण्यामुळे त्याचं आधीचं लग्न मोडलं होतं, जो त्याचा प्रेमविवाह होता. त्यावेळीही त्याला अशाच काहीशा शंका आल्या आणि त्याने विवाह रद्द केला होता. नंतरही ‘मला अजून हिच्यापेक्षा चांगली मुलगी मिळेल, माझं आणि हिचं भांडण होऊन घटस्फोट झाला तर?’ या अशा विचारांबरोबर ‘ह्या मुलीची ठेवण चांगली वाटत नाही, हिचे दात व्यवस्थित नाहीत, हिला कपडय़ांचा सेन्स नाही’ अशा अतार्किक विचारांमुळे तो आलेल्या प्रत्येक स्थळाला नकार देत राहिला. यावेळी मात्र प्रज्ञाला होकार दिल्यावर, लग्नाची तयारी सुरू झाल्यावर आणि महत्त्वाचं म्हणजे लग्न दोन महिन्यांवर आल्यावर त्याने प्रज्ञामध्येही कमतरता शोधल्या आणि विवाह रद्द करण्याच्या गोष्टी सुरू केल्या. त्यात महत्त्वाचं कारण ठरलं ते म्हणजे त्याची पूर्वाश्रमीची प्रेयसी, जिच्याबरोबर त्याने विवाह मोडला होता ती आता त्याला आठवायला लागली होती. आणि तिची त्याने प्रज्ञाबरोबर तुलना करायला सुरुवात केली होती.
‘मला कळतंय की तुलना करायची नसते, पण नातं जन्मभर निभवायचं असेल तर तुमचा पार्टनर परफेक्ट असायला नको का? आता असं झालंय की जसजशा आमच्या भेटी वाढायला लागल्या आहेत तसतशा मला तिच्यातल्या उणिवा प्रखरतेने दिसायला लागल्या आहेत. मला प्रचंड याचा ताण येत चालला आहे.’ एवढं बोलून सागरने दोन्ही हातांनी डोकं पकडलं. सागरशी बोलताना, त्याच्या विचारांचा आणि स्वभावाचा अभ्यास करताना असं लक्षात आलं की तो ‘ओसीडी’ या विकाराने ग्रस्त होता आणि त्यातही तो ‘रिलेशनशिप ओसीडी’चा सामना करत होता.
आता रिलेशनशिप ओसीडी म्हणजेच Rध्ण्अ. ज्यामध्ये व्यक्ती ही तिच्या नात्यातील दुसऱया व्यक्तीच्या कमतरतेवर कायम पराकोटीचं लक्ष ठेवते आणि त्याबद्दल ताण आणि चिंतेचा सामना करत राहते. मग अशी व्यक्ती कायम अनिश्चितता आणि अतिविचारांच्या जाळ्यात इतकी अडकत जाते की त्यातून तिला समोरच्या व्यक्तीत कायम दोष दिसायला लागतात. मग आर ओसीडीग्रस्त व्यक्ती तुलनेतही जाऊ शकते. काही ‘आर ओसीडीग्रस्त व्यक्ती’ या आपल्या जोडीदाराबद्दल साशंक होतात. म्हणजेच त्यांना जोडीदाराचे वर्तन, स्वभाव आणि काम करणे यात शंका यायला तरी लागतात. तो अपरिपूर्ण आहे अशी भावना एकदा का त्यांच्यात आली की त्यांना जोडीदाबद्दल आकर्षण आणि आपलेपणही वाटेनासे होते.
बरेचदा रिलेशनशिप ओसीडी असणाऱया व्यक्तींना स्वतच्या नकारात्मक विचारांची जाणीव असते, पण ते त्यांना नजरेआड करू शकत नाहीत, कारण त्याचवेळी त्यांचा मेंदू त्यांच्या भूतकाळातल्या नातेसंबंधांशी निगडित कटू आठवणी (ब्रेकअप्स, इतर नात्यातल्या व्यक्तींची असलेली भांडणं) अशा आठवणींचा साठा लगेच उपलब्ध करून देतो. सागरमध्ये यातील बरीच लक्षणे जाणवत होती. त्याने हे मान्य केलं की तोही अशाच पातून जात असल्याने त्याला प्रज्ञाला भेटायची, तिला साधी मिठी मारायचीही इच्छा होत नव्हती. म्हणून त्याने प्रज्ञाकडे वेळ मागितला होता आणि तिनेही त्याला त्याचा वेळ देऊ केला होता. सागरची जेव्हा सत्रं सुरू झाली तेव्हा त्याने त्याच्या भीती, चिंता उपस्थित केल्याच, शिवाय त्याला वारंवार येणारे अनाठायी विचार याबद्दल बोलायला सुरुवात केली.
त्यावेळी त्याला येणाऱया प्रत्येक अतार्किक विचारावर गुंतून न पडता आणि त्या विचारावर कृती न करता कसे ‘पुढे जावे’ हे मानसशास्त्राrय दृष्टिकोनातून सुचवले गेले. तसेच त्याचा सरावही करून घेतला गेला. कारण ओसीडीमध्ये विचार जास्त तीव्र असल्यामुळे आणि त्यांच्या श्रुंखला अधिक गुंतागुंतीच्या असल्यामुळे त्यावर काम करणे हा थेरपीचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. त्यावेळी व्यक्ती विचाराने थकू शकते, कारण मेंदूमध्ये तयार झालेली अतार्किकतेची साखळी तोडणे आणि नवीन विचारप्रणाली स्वीकारणे यामध्ये सुरुवातीला मेंदू स्वतला तयार करत असतो. मात्र त्याला समजा सरावाची जोड दिली तर तो हा बदल स्वीकारतो आणि त्याप्रमाणे वागायला सुरुवात करतो. हे जसं समजायला गुंतागुंतीचं आहे तेवढंच मानसशास्त्रात अत्यंत शिस्तबद्ध, काटेकोर आणि व्यक्तिसापेक्ष सोप्पं असतं. त्यामुळे मानसोपचार किंवा समुपदेशन घेणारी
‘आर ओसीडीग्रस्त व्यक्ती’ ही नंतरच्या टप्प्यात अधिकाधिक मोकळी, तणावविरहित होत जाते.
सागरच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्याच्यात हळूहळू सुधारणा दिसून येत होती. तो स्वतमध्ये बदल करत होताच. शिवाय ओसीडीग्रस्त विचारांच्या जाळ्यातून बाहेर पडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत होता. त्यामुळे त्याचं लग्न हे त्याने थोडं पुढे ढकललं. त्यात त्याला प्रज्ञाची साथ मिळत होती हे विशेष. मनासारखा जोडीदार यापेक्षा वेगळा नसतो हे तिच्या वागण्यातून, समजूतदारपणातून सिद्ध होत होतं.
(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत.)

























































