रावणफोंड येथे मुलगा ओहळात वाहून गेला; शोधमोहीम सुरू

a-boy-drawn-in-rawanfond-go

सामना ऑनलाईन । पणजी

दक्षिण गोव्यातील शांतीनगर-रावणफोंड येथे सोमवारी सायंकाळी एक मुलगा ओहोळातील पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेला. रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध लागला नव्हता.

उपलब्ध माहितीनुसार शांतीनगर येथे काही लहान मुले खेळत होती. त्यापैकी एक मुलगा सायकलवर होता. शांतीनगर येथील ओहोळाजवळ खेळताना त्याचा तोल जाऊन तो पाण्यात पडला. सोमवारी दिवसभर मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे या ओहोळातून जात असलेल्या पाण्याच्या प्रवाहाला गती होती. यात तो वाहून गेला. ही घटना सोमवारी सायंकाळी 4 च्या सुमारास घडली. काही वेळाने एका मुलाने या घटनेची माहिती दिल्यानंतर शोध मोहीम सुरू झाली.

अग्नीशमन दलाला ही घटना कळली तेव्हा त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि शोध कार्य सुरू केले. ज्या परिसरात ही घटना घडली तो परिसर नावेली मतदारसंघात मोडतो. नावेलीचे आमदार लुईझिन फालेरो यांना त्याची माहीती मिळताच त्यांनी या प्रकरणात जातीने लक्ष घातले.

कुडचडेच्या अग्नीशामक दलाच्या केंद्राकडे छोटी बोट होती. तेथून ही बोट शांतीनगर येथे आणण्यात आली आणि टॉर्चच्या साहाय्याने त्या लहान मुलाचा शोध घेण्यास सुरुवात झाली. नावेलीचे आमदार फालेरो त्या बोटीत बसून त्या मुलाचा शोध घेत होते. रात्री उशिरापर्यंत तो मुलगा सापडला नव्हता. आज मंगळवारी सकाळी पुन्हा शोध कार्यास सुरू होईल अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या