बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याने गळफास घेत केली आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
farmer-suicide-01

दर पाच वर्षाने येणाऱ्या भीषण दुष्काळाचा सामना बीड जिल्ह्याला करावा लागतो. या दुष्काळाच्या गंभीर परिस्थितीत शेकडो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना ताज्या असतानाच बीड जिल्ह्यातील आष्टीमध्ये रविवारी एका शेतकऱ्याने अतिवृष्टीला कंटाळून जीवन संपवले आहे. सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिके नष्ट झाली. सोयाबीन पाण्याखाली गेले. आता कसे जगावे या विवंचनेत पांढरीच्या या शेतकऱ्याने गळफास घेत आत्महत्या केली आहे.

आष्टी तालुक्यातील पांढरी येथील दादासाहेब बाबुराव वांढरे (56) या शेतकऱ्याने आपल्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दादासाहेब वांढरे यांची चार एकर शेती आहे. कोरडवाहू शेतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीने खरिप हंगाम वाया गेला. शेतातील सर्व पिकांचे नुकसान झाले. नुकसान झालेल्या या पिकांचा अधिकारी पंचनामा करत नाहीत. कोणत्या मदतीची शक्यता नाही. मशागतीसाठी आणलेली उसनवारी कशाने फेडायची, वर्षभर काय खायचे, लेकरं बाळं कसे जगावायचे या चिंतेत असलेल्या दादासाहेब वांढरे यांनी गळफास घेत आत्महत्या केली. दादासाहेब यांना एक मुलगा, चार मुली, पत्नी असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेने बीड जिल्हा हादरला आहे.

ऑनलाईन फॉम भरा, नाहीतर जमीन पडीक म्हणून गृहीत धरली जाईल
एकीकडे परतीच्या पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे. रविवारीही बीड जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर होता. दिवसभर पावसाच्या सरी कोसळत होत्या. तर दुसरीकडे महसूल खात्याने जून-जुलैमध्ये पेरणी केलेल्या खरिप हंगामाचा पेरा एका अर्जावर ऑनलाईन पद्धतीने भरण्याचे फर्मान काढले. जर हा पिकपेरा फॉर्म भरून न दिल्यास ती शेती पडीक असल्याचे गृहीत धरले जाईल असे म्हटले गेले. एकीकडे सर्व्हर डाऊन आहे, पावसाच्या सरी कोसळत आहे. झालेल्या नुकसानीमध्ये शेतकरी चिंतेत आहेत हे सगळे संकटे बाजुला असून शेतकऱ्याला बांधावर जाऊन पीक पेऱ्याचा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरावा लागत आहे.