धारावीकरांना हुसकावण्याचा डाव हाणून पाडू! सर्वपक्षीय सभेत निर्धार

धारावीतील सर्व निवासी अनिवासी झोपडय़ांना पात्र ठरवून त्यांचे धारावीतच पुनर्वसन करावे, सर्व धारावीकरांना 500 चौरस फुटांची घरे तसेच व्यावसायिक गाळेधारकांना वापरात असलेल्या आकाराचे पुनर्वसन गाळे मोफत द्या, अशा विविध मागण्यांसाठी धारावी बचाव आंदोलनातर्फे शुक्रवारी सायंकाळी शीव-माहीम लिंक रोड येथे जाहीर सभा घेण्यात आली. विकासाच्या नावाखाली धारावीकरांना मिठागरे आणि मुलुंडला हुसकावून लावण्याचा अदानी आणि राज्य सरकारचा डाव आम्ही हाणून पाडू, असा इशारा धारावीकरांनी दिला.

धारावीचा सर्व्हे अदानीच्या पंपनीऐवजी सरकारने करावा म्हणजे पात्र-अपात्रतेचा मुद्दा राहणार नाही. घराला घर मिळाले पाहिजे ही आमची मागणी आहे, असे माजी आमदार बाबूराव माने म्हणाले.

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड, शिवसेना विभागप्रमुख महेश सावंत, विभाग संघटक श्रद्धा जाधव, विधानसभा संघटक विठ्ठल पवार, राष्ट्रवादीच्या राखी जाधव, माजी नगरसेवक वसंत नकाशे, मरिअम्मल तेवर, टी. एम. जगदीश, हर्षला मोरे, महिला समन्वयक माया जाधव, शेकापचे राजू कोरडे, भाकपचे प्रकाश रेड्डी, आम आदमी पक्षाच्या मुंबई अध्यक्षा प्रीती मेनन, संदीप कटके, रिपब्लिकन पक्षाचे संजय भालेराव, धारावी भाडेकरू महासंघाचे अनिल कासारे, बसपाचे शामलाल जयस्वाल, वंचित बहुजन आघाडीचे विनोद जयस्वाल, आझाद पार्टीचे पैलास जयस्वाल आदी उपस्थित होते.

शिवसेना पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या, ‘सब भूमी गोपाल की’ असे विनोबा भावे म्हणाले होते. पण मोदींच्या कृपेमुळे आता ‘सब भूमी अदानी की’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. धारावीचा पुनर्विकास करताना 1 जानेवारी 2000 पूर्वीचे रहिवासी पात्र आणि त्यानंतरचे रहिवासी अपात्र असे अदानी पंपनीने ठरवले आहे. सर्व प्रकारचे टॅक्स धारावीकर सरकारच्या तिजोरीत जमा करतात. मग धारावीकरांना पात्र-अपात्र ठरवणारे अदानी कोण, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.