कोविशील्डच भारी…

कोरोना महामारीने अख्खं जग अक्षरशः वेठीस धरले होते. दोन लसी बाजारात आल्यानंतर जीव भांडय़ात पडला. सुरुवातीला लस घेण्यास घाबरणारेही नंतर लस घेण्यासाठी रांगा लावू लागले. कोव्हॅक्सिन आणि कोविशील्ड अशा दोन लशी उपलब्ध होत्या. पण, दोन्हींपैकी कोणती अधिक परिणामकारक असा प्रश्न अद्यापि लोकांना सतावत होता. आता त्याचे उत्तर मिळाले आहे. कोव्हॅक्सिनपेक्षा कोविशील्ड ही लस सर्वाधिक परिणामकारक असल्याचा निष्कर्ष एका संशोधनातून समोर आला आहे.

जून 2021 ते जानेवारी 2022 दरम्यान संशोधन करण्यात आले. यात 18 ते 46 दरम्यानच्या 691 सहभागींवर लशीचा प्रयोग करण्यात आला. सर्वजण पुणे आणि बंगळुरूमधील होते. लस दिल्यानंतर कोविशील्ड अधिक वेगाने परिणाम करत असल्याचे निदर्शनास आले.

कोविशील्डने सेरोनेगेटिव्ह आणि सेरोपॉझिटिव्ह अशा दोन्ही लोकांमध्ये हाय अँटीबॉडीची पातळी दर्शवली. ही पातळी अधिक शक्तिशाली आणि रोगप्रतिकारक शक्ती दाखवत असल्याचे निदर्शनास आले. कोविशील्डने कोव्हॅक्सिनपेक्षा जास्त टी पेशी निर्माण केल्या, ज्या मजबूत रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करू शकतात.

असे मिळाले उत्तर

लॅसंट रिजनल हेल्थ साऊथ ईस्ट आशियाच्या जर्नलमध्ये 6 मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या संशोधनातून कोणती लस सर्वाधिक परिणामकारक या प्रश्नाचे उत्तर मिळाले, असे वृत्त लाईव्ह मिंटने दिले आहे. हे संशोधन 11 संस्थांनी एकत्र येऊन केले. यात नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल रिसर्चच्या संशोधकांचाही समावेश होता.