
सामना प्रतिनिधी, नाशिक
ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने सिन्नर परिसरात घरफोड्या करणाऱ्या मध्यप्रदेश येथील टोळीतील दोन सराईत गुन्हेगारांना पकडले आहे. या टोळीने सिन्नर परिसरात सहा गुन्हे केल्याची कबुली दिली.
औद्योगिकदृष्टय़ा विकसित होणाऱ्या सिन्नर परिसरात दिवसेंदिवस रोजगारासाठी येणाऱया परराज्यातील कामगारांची संख्या वाढत आहे, तसेच घरफोडी व चोरीच्या घटनाही वाढत आहेत. जिल्हा पोलीस अधिक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अशोक करपे यांनी या गुह्यांचा समांतर तपास हाती घेतला.
पथकाने गुन्ह्यांची पद्धत, तसेच सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली असता हे गुन्हेगार मध्यप्रदेशातील असल्याचे समजले. मध्यप्रदेशातील धार जिह्यातील अतिदुर्गम भागात पथक तीन दिवस तळ ठोकून होते. या पथकातील अधिकारी व कर्मचाऱयांनी कामगारांच्या वेशात सापळा रचला. धार जिल्ह्यातील सिंगाचोरी येथील ठाकूर ऊर्फ कालू हारू मंडलोई (23), गोरडीया येथील करमसिंग कालू भुरीया (32) यांना पकडण्यात आले. त्यांनी मुन्ना हरी सिंग, अजय सिंग, करण सिंग यांच्या मदतीने सिन्नरच्या सरदवाडी रोड, शिवाजीनगर, पांडवनगरी, गाडे मळा व उद्योग भवन परिसरात सहा घरफोडय़ा केल्याची कबुली दिली. हे सर्वजण इमारत बांधकामाच्या ठिकाणी मजूरकाम करायचे. त्यांनी दिवसा बंद घरांवर पाळत ठेवून रात्री घरफोडय़ा केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यांच्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे.


























































