पंघालला कांस्यासह पॅरिसचेही तिकीट

सोनेरी पदक हुकले असले तरी अंतिम पंघालने स्वीडिश एमा जोना डेनिसचा 16-6 असा पराभव करत जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत 53 किलो वजनी गटात कांस्य पदक जिंकण्याचा पराक्रम केला. तिने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत 19 व्या वर्षीच पदक जिंकून ती सर्वात तरुणी कुस्तीपटू ठरली. एवढेच नव्हे तर या पदकामुळे तिने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आपला कोटा आणि तिकीट निश्चित केले आहे.

पंघालने बुधवारी जगज्जेत्या ऑलिव्हियावर मात करत विजयी सलामी देत सनसनाटी निर्माण केली होती, मात्र दुसऱया फेरीत तिला पराभवाचा धक्का सोसावा लागल्याने तिचे सुवर्ण आणि रौप्य हुकले होते. मात्र तिच्या कांस्य पदकाच्या आशा कायम होत्या. त्या आज तिने साकारत हिंदुस्थानसाठी ऑलिम्पिकचे आणखी एक स्थान निश्चित केले. स्वीडनच्या एमाचे अंतिमपुढे काहीएक चालले नाही. तिच्या वेगवान खेळाने एमाला नामोहरम केले. दोनवेळा युरोपियन चॅम्पियन असलेल्या एमाचा खेळ पंघालसमोर तोकडा ठरला.