
छत्रपती शिवजी महाराज हे आमचे दैवत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे 16 नोव्हेंबरला हिंदुस्थानात येणार आहेत. मात्र, याचे राजकारण करण्यात येऊ नये. या वाघनखांबाबत जनतेला योग्य ती माहिती मिळावी, यासाठी आपण सरकारला तीन, चार प्रश्न विचारले होते. मात्र, त्यावर उत्तर देण्याऐवजी ते विषय टाळत आहेत. तसेच खालच्या स्तरावर जात टीका करण्यात येत आहे. हीच भाजपची भाषा आहे काय, हाच यांचा चेहरा आहे काय, त्यांनी त्यांच्या भाषेतून जनतेसमोर त्यांचा खरा चेहरा उघड केला आहे. माझ्या प्रश्नांमुळे त्यांची बोलती बंद होते. एका आदित्यने त्यांना सळो की पळो करून सोडले आहे, अशा शब्दांत शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.
ही वाघनखे फक्त तीनवर्षांसाठी हिंदुस्थात येणार आहेत. त्यानंतर ती लंडनला परत नेण्यात येतील. ही वाघनखे कायमस्वरुपी हिंदुस्थानात असावी, अशी जनतेची भावना आहे. छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहेत. त्यामुळे या मुद्द्यांवर भावनांशी खेळ करू नये. व्हिटोरिया अल्बर्ट वेबसाईटवर याची माहिती आहे. जोम्स ग्रँट डफ या इतिहासकाराच्या संग्रहातील ही वाघनखे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचीच ही वाघनखे असल्याचा त्यांचा दावा आहे. मात्र, याची पुष्टी करता येत नसल्याचे वेबसाईटवर म्हटले आहे. त्यामुळे यावर स्पष्टीकरणाची गरज आहे, भावनांशी कोठेही खेळ नको, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
ही वाघनखे खरोखर छत्रपती शिवाजी महाराजांची असतील, तर काहीही करा, ही वाघनखे कायमस्वरुपी आपल्याकडे आली पाहिजेत. ही वाघनखे परतावा आहेत, की लोनवर येणार आहेत, याचेही स्पष्टीकरण द्यावे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. आपल्या या प्रश्नांना उत्तरे देण्याऐवजी ते खालच्या स्तरावरील टीका करत आहेत. देशात त्यांनी एकाला पप्पू नाव ठेवले होते. त्यांनी यांना हलवून ठेवले आहे. आता आका आदित्यने त्यांना सळो की पळो करून सोडले आहे. त्यांनी टीका करताना माझ्या नावपुढे बाळ लावले आहे. याचा मला अभिमान आहे, माझ्या आजोबांचे नावही बाळ होते. लढाऊ वृत्ती आमच्या रक्तातच आहे. मात्र, त्यांच्या भाषेतून त्यांचे नैराश्य स्पष्टपणे दिसत आहे. त्यांचे विचार किती खालच्या पातळीचे आहेत, हे दिसून येते, असा जबरदस्त पलटवार आदित्य ठाकरे यांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे. ही नव्या भाजपची भाषा आहे काय, हा चेहरा नव्या भाजपचा आहे काय, असा सवालही त्यांनी केला. आम्ही अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवानी यांची भाजप ओळखतो. नवा भाजप असा असेल असे आम्हाला वाटले नव्हते. त्यांनी जनतेला त्यांची भाषा दाखवली आहे.


























































