एप्रिल फूल डे म्हणजे अच्छे दिन; आदित्य ठाकरे यांचा भाजपवर हल्लाबोल

महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजय देशमुख हे आज यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे आज विदर्भात आहेत. नागपूर विमानतळावर आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

यवतमाळ-वाशिमसाठी आज उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहे. तसेच प्रचार सभाही आहेत. हे सगळं होत असताना एनडीएकडून तिथे उमेदवारच जाहीर झालेला नाहीये. भ्रष्ट उमेदवार देणार की नवीन कोण चेहरा येणार? हा प्रश्न आहे, असा टोला आदित्य ठाकरे यांनी भाजपसह महायुतीमधील घटक पक्षांना लगावला आहे.

बंडखोर आणि गद्दारांमध्ये खूप फरक असतो. साधारणपणे जे 40 गद्दार आहेत, त्यांनी एकूण परिस्थिती पाहता पुढचा विचार करावा. कारण जिथे-जिथे गद्दारी झालेली आहे, तिथे लोकांनी त्यांना नाकारलेलं आहे, हे चित्र स्पष्ट होत चाललं आहे, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी गद्दारांवर निशाणा साधला. भाजपचं केंद्रातलं 10 वर्षांतलं आणि राज्यातलं सरकार पाहिल्यास जी कामं व्हायला पाहिजे होती, जी आश्वासनं दिली होती. ती म्हणजे एप्रिल फूल करणारी होती. कालच एप्रिलू फूल डे होऊन गेला. जगात काही ठिकाणी एप्रिल फूल डे साजरा होतो, आपल्याकडे अच्छे दिन म्हणून साजरा केला जातो, असे म्हणत आदित्य ठाकरे भाजपवर हल्लाबोल केला.

देशात परिवर्तनाचे वारे वाहत आहेत. आम्ही काल-परवा दिल्लीत होतो. तिथे असो की बिहार, झारखंड, महाराष्ट्र असो की पश्चिम बंगाल, सगळीकडे ‘इंडिया’ आघाडीची जी मोट बांधण्यात आली आहे, ती बळकट आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

शिवसेना वाचवायला राष्ट्रवादीविरोधात लढत होते. आता काय झालं मग? जे काही वर्षांपूर्वी, काही महिन्यांपूर्वी बोलत होते. त्यांनी जेव्हा गद्दारी केली तेव्हा, कुठल्या पक्षात हे लोक आहेत, हे जनतेला माहिती आहे. लोकांसमोर हे चित्र स्पष्ट झालेलं आहे, असा टोला आदित्य ठाकरे यांनी महायुतीच्या आढळराव पाटील यांना लगावला आहे.

आम्ही थेट जनतेच्या संपर्कात आहोत. आणि जनता निवडणुकीत आमच्या सोबत राहील, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. माजी मंत्री आणि आमदार बच्चू कडू आपल्याल संपर्कात आहेत का? यावर आदित्य ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट केली.

देशात लोकशाही संपत चालली आहे. संविधानाला मोठा धोका आहे. यामुळेच आम्ही सर्व एकत्र येऊन जे लोकशाही संपवत आहेत आणि संविधान बदलवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्याविरोधात लढतोय. ज्यांना लोकशाही आणि संविधान वाचवायचे आहे ते आमच्या सोबत राहतील, असे आदित्य ठाकरे म्हणाले. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेबाबत विचारलेल्या प्रश्नावर आदित्य ठाकरेंनी वरील उत्तर दिले.