व्हीपचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होणारः आदित्य ठाकरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घटनाबाह्य होती. कायद्याला अनुसरून नव्हती. आमच्या व्हीपचे उल्लंघन झाले आहे. यासंदर्भात याचिका दाखल करू. ज्यांनी कोणी व्हीपचे उल्लंघन केले, त्यांच्यावर कारवाई तर करणारच, असा इशारा शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज दिला.

विधिमंडळात विश्वासदर्शक ठरावावरील मतदानानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, न्यायालयात प्रकरण प्रलंबित असताना अशाप्रकारे बहुमत चाचणी घेणे घटनाबाह्य आहे. आज बंडखोर आमदार सत्तेत आले, पण जेव्हा मतदारांसमोर जातील तेव्हा त्यांना कळेल. आपल्या मतदारसंघातील मतदारांचे काय मत आहे ते समजेल.

जे आमदार सोडून गेले आहेत त्यांना शिवसेना संपवायची आहे. पण शिवसेना कधीही संपली नाही आणि संपणार नाही. निवडणुकीला आम्ही तयार आहोत. दुप्पट ताकदीने शिवसेना पुढे येईल आणि भगवा फडकवेल, असा विश्वासही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

जन्मपक्षात असे करू शकतात, तर कर्मपक्षातही करणार

एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 20 मे रोजी बोलावून विचारले होते की तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे आहे का? त्याचा मी साक्षीदार आहे. शिंदे यांच्या भूमिकेवरून हे सिद्ध होते की ते आधीच फितूर झाले होते. जन्मपक्षात जर ते असे करू शकतात, तर कर्मपक्षातही करणार. त्यामुळे जिकडे ते गेले आहेत, त्यांनीही सावध राहावे, असा इशाराही त्यांनी भाजपला दिला.