निवडणुका लागतील तेव्हा शिंदे–फडणवीसांना गल्लीबोळात फिरायला लावेन! आदित्य ठाकरे यांचा तडाखा

महाराष्ट्रात निवडणुका लागतील तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना गल्लीबोळात फिरायला लावेन, असे ललकारतानाच जनतेच्या पाठिंब्यावर वरळीच काय, आम्ही महाराष्ट्र जिंकून दाखवू, असा जबरदस्त आत्मविश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज व्यक्त केला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांनाही वरळीत जोडीने सभा घ्यावी लागत आहे येथेच माझा विजय झाला आहे, असे नमूद करत आदित्य ठाकरे यांनी चौफेर फटकेबाजी केली.

सचिन तेंडुलकर बॅटिंगला जायचा तेव्हा फिल्डिंग कशी लावायची याचा विचार बॉलर करायचे. तशीच फिल्डिंग आज हे लावत आहेत… तुम्ही कशीही फिल्डिंग लावली तरी मी सिक्स मारणारच आणि वरळीत मी जिंकणार म्हणजे जिंकणारच, हे मी आज इथेच सांगतो.’

आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद दौऱयाला तुफान प्रतिसाद मिळत आहे. नाशिकच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील निफाड तालुक्यात चांदोरी, विंचूर तसेच नांदगाव येथे मंगळवारी आदित्य ठाकरे यांनी शेतकरी, युवक, सर्वसामान्य नागरिक, महिलांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी मिंधे गट आणि भाजपचा यथेच्छ समाचार घेतला. जनतेचे आशीर्वाद आणि प्रेमामुळे मी राज्यभर संवाद दौरा करत आहे. मुख्यमंत्री असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कामावर विश्वास असल्याने मोठा प्रतिसाद मिळत आहे. चाळीस गद्दारांनी आमच्या पाठीत वार केले. स्वतःला शक्तीशाली समजणारे नेते सोडून गेले, पण निष्ठावंत शिवसैनिक आहे तिथेच आहे, याचा अभिमान वाटतो, असे नमूद करत आदित्य ठाकरे यांनी मिंध्यांना आव्हान दिले.

वरळीत माझ्या मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जोडीने येत आहेत, त्यांना जोडीने माझ्या मतदारसंघात सभा घ्यावी लागत आहे. याचा मला आनंद आहे. माझा विजय आजच झाला आहे, असे मी समजतो, असे आदित्य ठाकरे म्हणाले. जगभरात जिथे-जिथे मोठे गेम होतात, तिथे ताकदवान खेळाडूला हरविण्यासाठी मोठी फिल्डींग लावली जाते. फुटबॉलमध्ये मेस्सी किंवा रोनाल्डो मैदानात उतरतात, तेव्हा त्यांच्यासमोर पाच-दहा खेळाडू उभे ठाकतात आणि एकटयाला भिडतात पण ते पुरून उरतात. तेच आज वरळीत चालले आहे, असे सांगत आदित्य यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला.

सातवा उद्योग महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात चाललाय!

मिंधे सरकारच्या काळात आणखी एक उद्योग महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात जात आहे. त्याकडे लक्ष वेधत आदित्य ठाकरे यांनी निशाणा साधला. महाराष्ट्रात येणारा सातवा उद्योग आता मध्य प्रदेशात जात आहे. याआधी सहा उद्योग गुजरात आणि इतर राज्यांत गेले पण सरकार काहीच करत नाही, असे नमूद करताना एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत की गुजरातचे, असा सवाल आदित्य यांनी केला. सध्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांत खरा मुख्यमंत्री कोण, हे दोघांनाही समजत नसल्याचा टोलाही आदित्य यांनी पुढे लगावला. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, अद्वय हिरे, माजी आमदार अनिल कदम, उपनेते सुनील बागुल, संपर्कप्रमुख जयंत दिंडे, आदींसह पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.

गद्दारी करून, धोका देऊन आलेले हे सरकार येत्या दोन-तीन महिन्यात कोसळल्याशिवाय राहणार नाही. निवडणुका लागतील तेव्हा मी यांना वरळीतील गल्लीगल्लीत फिरायला लावणार आहे. वरळीच काय संपूर्ण महाराष्ट्रात विजय आमचाच होईल.

अधिवेशनात आवाज उठविणार

शिवसंवाद यात्रेत दोन दिवसात शेतकरी, बेरोजगारांनी अनेक प्रश्न मांडले. बांग्लादेशला जाणाऱया द्राक्षावरील वाढीव आयात शुल्क, इतर शेतीपिकांचे प्रश्न, पीकविमा यासह नार-पार योजनेत नांदगावसह आवश्यक असलेल्या भागाचा समावेश करणे, नाशिकची बिघडलेली कायदा सुव्यवस्था, शिवसैनिकांवर सूडाने, राज्यकर्त्यांच्या दबावापोटी दाखल करण्यात येणारे खोटे गुन्हे यासह सर्वच समस्यांवर येत्या अधिवेशनात आवाज उठविण्यात येईल, असे अंबादास दानवे म्हणाले.

महाशक्ती पाठीशी आहे, मग घाबरता कशाला?

नियमित कर्ज फेडणाऱया शेतकऱयांना प्रोत्साहन अनुदानाचे पन्नास हजार रुपये हे सरकार देऊ शकले नाही. मुंबईत स्वतःच्या हार्ंडगसाठी पन्नास कोटी रुपये खर्च करणारे हे मुख्यमंत्री शेतकऱयांना पन्नास रुपये देऊ शकत नाहीत. दिल्लीपुढे झुकणारे हे मुख्यमंत्री महाराष्ट्रासाठी काहीच करू शकत नाही, हे जनतेच्या लक्षात आले आहे. खरोखर महाशक्ती पाठीशी आहे तर घाबरता कशाला, घ्या निवडणुका, महाराष्ट्र काय आहे, हे जनता तुम्हाला दाखवून देईल, असे आदित्य ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.

सभा सुरू असताना वाहनांवर दगडफेक, मिंधे गटातील आमदार बोरनारेंवर संशय

आदित्य ठाकरे यांची वैजापूर येथे सभा सुरू असतानाच सभास्थानी उभ्या असलेल्या त्यांच्या वाहनांवर जमावाने दगडफेक केल्याची घटना घडली. या जमावाला मिंधे गटातील स्थानिक आमदार बोरनारे यांनी भडकवल्याचा संशय आहे.

रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. वैजपुरात आदित्य ठाकरे यांची सभा सुरू होती. त्यावेळी सभेजवळून मातोश्री रमाई यांची मिरवणूक जात होती. आदित्य ठाकरे यांनी त्यागमूर्ती माता रमाईंबद्दल आदर व्यक्त करत मिरवणूक शांततेत जाऊ द्यावी, असे आवाहन केले. काही वेळाने मिरवणुकीतील चार-पाच जणांनी अचानक दगडफेक सुरू केली. आदित्य ठाकरे आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या वाहनांवर ही दगडफेक झाली. त्यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते.

आदित्य ठाकरे यांची सुरक्षा वाढवा

आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर झालेला हल्ला हा एकनाथ शिंदे गटातील आमदारांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र येत आहेत. ते एकत्र येऊ नयेत म्हणून काही लोकांनी जाणीवपूर्वक हे कारस्थान केले. हिंदू आणि दलित बांधवांमध्ये दंगल घडवण्याचा हा डाव आहे. सरकारकडून आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेतदेखील जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. त्यांच्या सुरक्षेत सरकारने तातडीने वाढ केली पाहिजे, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली.