देशात सर्वत्र अंध:कार पसरलाय, मशाल हाती घ्या! आदित्य ठाकरे यांचे आवाहन

महागाई वाढलीय. बेरोजगारी शिखरावर पोहोचलीय. भ्रष्टाचार बोकाळलाय. सर्वत्र अंधार पसरलाय. तो दूर करायचा असेल, देशात परिवर्तनाचा प्रकाश आणायचा असेल तर मशाल हाती घ्यावीच लागेल, असे आवाहन शिवसेना नेते, युवा सेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी आज तमाम मुंबईकरांना केले. केंद्रात परिवर्तन होणार म्हणजे होणार, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

आदित्य ठाकरे यांनी आज धारावी आणि वडाळा येथील शिवसेना शाखांना भेटी देऊन शिवसैनिकांशी आणि जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत दक्षिण-मध्य मुंबईतील शिवसेना उमेदवार अनिल देसाई होते. धारावीच्या लेबर कॅम्प येथे झालेल्या संवाद सभेत बोलताना आदित्य ठाकरे यांनी धारावी पुनर्विकासाचा मुद्दा प्रकर्षाने मांडला. धारावी पुनर्विकासाचे काम ज्यांना दिलेय ते उद्योगपती अदानी म्हणजे मोदींचा माणूस आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवणार का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारताच धारावीकरांनी एका सुरात नकार दिला.

आदित्य ठाकरे यांनी यावेळी ईशान्य मुंबईतील भाजपा उमेदवार पियूष गोयल यांचाही समाचार घेतला. मुंबई झोपडपट्टीमुक्त करायच्या नावावर झोपडीवासीयांना बेघर करू पाहणाऱया गोयल यांनी केंद्रात मंत्री असताना गेल्या दहा वर्षांत मुंबईचा एकतरी मुद्दा संसदेत मांडलाय का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. गोयल रेल्वेमंत्री होते तेव्हा रेल्वे स्थानकांची नावे बदलली, पण परिस्थिती जशीच्या तशी आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

धारावीकरांना धारावीतच ट्रान्झिट कॅम्प द्या

धारावीत हजारो लोकांचे रोजगार आहेत, त्यांना वसई-विरारला नेऊन टाकले तर रोज धारावीत येणे त्यांना जमणार आहे का? त्यांना धारावीतच ट्रान्झिट कॅम्प मिळाले पाहिजे आणि तरच विकास करू देऊ, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला. वरळीमधील नागरिकांना महाविकास आघाडीने तिथल्या तिथे ट्रान्झिट कॅम्प देऊन इमारती बांधल्या, आता ते नागरिक डिसेंबरपर्यंत त्यांच्या नव्या घरातही जातील, याचा दाखलाही त्यांनी यावेळी दिला.

नो उल्लू बनाविंग

भाजपावाले लोकांना उल्लू बनवताहेत. त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका, असा सावधगिरीचा इशाराही आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिला. मोबाईल कंपनीची एक जाहिरात होती. नो उल्लू बनाविंग. ती डाऊनलोड करून घ्या, मिंधे गटातील कुणी तुमच्याकडे प्रचाराला आले आणि खोटी आश्वासने दिली तर त्यांना ती ऐकवा. असा सल्ला त्यांनी दिला.

ईडीला सह्या घ्यायला पाठवतील

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे धारावीवर अपार प्रेम आहे. कोविडच्या काळात ते रोज महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त यांना धारावीतील परिस्थितीचा आढावा घ्यायला सांगायचे. माझी धारावी कशी आहे अशी आपुलकीने विचारपूस करायचे. त्यामुळे कोविड काळातही धारावीकर सुरक्षित राहिले आणि त्याच धारावी मॉडेलचे कौतुक सर्वत्र झाले, अशी आठवणही आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितली. ही धारावी महाविकास आघाडीच्या, ‘इंडिया’ आघाडीच्या मागे उभी करा. नाहीतर उद्या भाजपाचे सरकार पुन्हा आले तर आज विरोधकांच्या घरी येणारी ईडी आणि सीबीआय उद्या धारावीकरांच्या घरी पुनर्विकासासाठी सक्तीने सह्या घ्यायला पाठवतील, असे आदित्य ठाकरे यांनी धारावीकरांच्या लक्षात आणून दिले.

जो घरमे वफा ना कर सके, बाहर क्या करेंगे

आदित्य ठाकरे यांनी यावेळी दक्षिण-मध्य मुंबईतील शिवसेना उमेदवार अनिल देसाई आणि मिंधे गटाचे उमेदवार राहुल शेवाळे यांची तुलना केली. अनिल देसाई हे स्वच्छ चारित्र्याचे आहेत, त्यांनी कधीही घोटाळा किंवा इतर भानगडी केल्या नाहीत, असे म्हणत त्यांनी शेवाळे यांच्यावर निशाणा साधला. ‘जो घरमे वफा ना कर सके वो बाहर क्या करेंगे’, ‘जो उद्धव साहब से वफा न कर सके वो मिंधे से क्या वफा करेंगे और जो किसी से कभी वफा न कर सके वो धारावीसे क्या वफा करेंगे’ अशा शायराना अंदाजात आदित्य ठाकरे यांनी शेवाळेंना लक्ष्य केले तेव्हा उपस्थितांनी वाहवा…वाहवा… अशी दाद दिली. महिलांना शिव्या देणारे, त्यांच्यावर अत्याचार करणारे दोन मंत्री आजही मिंधे सरकारमध्ये आहेत, असा आरोपही त्यांनी केला. दरम्यान धारावी कुणाच्याही घशात जाऊ देणार नाही, धारावीचा निर्णायक लढा यशस्वी केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे याप्रसंगी अनिल देसाई म्हणाले. या शाखा भेटींच्या वेळी शिवसेना विभागप्रमुख महेश सावंत, माजी आमदार बाबुराव माने, माजी महापौर श्रद्धा जाधव, हर्षला मोरे, आशीष मोरे यांच्यासह विभागांतील सर्व शाखाप्रमुख, माजी नगरसेवक, घटक पक्षांचे नेते आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

मुंबईचा आवाज दिल्लीत घुमलाच पाहिजे

यंदाच्या निवडणुकीत मुंबईचा आवाज दिल्लीत घुमलाच पाहिजे, असे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. केंद्रात कोणाला पाठवायचे हे मुंबईने ठरवले पाहिजे, नाहीतर भाजपवाले मुंबई गिळल्याशिवाय राहणार नाहीत, असा सावधगिरीचा इशाराही त्यांनी दिला. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची आहे हे बाहेरची लोक येऊन महाराष्ट्रात सांगतात, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे बोट धरून मोठे झालेले शिवसेना असली की नकली म्हणतात, या प्रवृत्तीला पुन्हा दिल्लीत पाठवले तर उद्या मुंबईचा नकाशाही बदलून टाकतील, अशी टीकाही आदित्य ठाकरे यांनी केली.

मूळ भूमीवरच धारावीकरांचा पुनर्विकास

पुनर्विकास करताना धारावीतील सुमारे सव्वा लाख लोकांना अपात्र ठरवून बेघर करण्याचा अदानींचा डाव आहे, असा आरोपही आदित्य ठाकरे यांनी यावेळी केला. इतरांना वसई-विरारच्या मिठागरांवर ट्रान्झिट कॅम्प दिले जाणार आहेत, असे ते म्हणाले. धारावीच्या भूमीवर मूळ धारावीकरांचाच हक्क आहे असे सांगतानाच, पुनर्विकास होत असताना केवळ धारावीचाच झाला पाहिजे, अदानींचा नको अशी शिवसेनेची ठाम भूमिका असल्याचे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.