263 कोटींच्या स्ट्रीट फर्निचर टेंडरविषयी मिहिर कोटेचा अधिवेशनात खोटं बोलले, आदित्य ठाकरेंकडून पोलखोल

मुंबई महानगर पालिकेतील 263 कोटींच्या स्ट्रीट फर्निचर घोटाळ्याविषयी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार, नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्यपालांकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीचा पाठपुरावा करत त्यांनी त्याबाबत लोकायुक्तांना पत्रही लिहिलं होतं. त्यानंतर पावसाळी अधिवेशनात हे कंत्राट रद्द झाल्याची घोषणा तत्कालीन आमदार भाजपचे लोकसभेचे उत्तर-पूर्व मुंबईचे उमेदवार मिहिर कोटेचा यांनी केली होती. पण, हे कंत्राट रद्द झालं नसून भर सदनात कोटेचा खोटं बोलले, अशी पोलखोल आदित्य ठाकरे यांनी विक्रोळीत केली.

विक्रोळी येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेला आदित्य ठाकरे यांनी बुधवारी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. भाजपने मुंबईतून लोकसभेसाठी फक्त दोनच उमेदवार जाहीर केले आहेत. पण, ते उमेदवार खोटं बोलणारे आणि मुंबईकरांना मुंबईतून हद्दपार करायला पाहणारे आहेत, असा हल्लाबोलही आदित्य ठाकरे यांनी केला. ते म्हणाले की, मुंबईचे भाजपचे दोन उमेदवार घोषित झाले आहेत. त्यातील एक मिहिर कोटेचा. मी त्यांचं एक वैशिष्ट्य सांगतो की ते भाजपची लाईन पाळणारे आहेत. मी जेव्हा स्ट्रीट फर्निचर घोटाळा मी बाहेर काढला तेव्हा भाजपच्या परंपरेला जागत श्रेय घेण्यासाठी त्यांनी पत्र लिहिलं आणि अमुक-तमुक करावं अशी मागणी केली. त्यांचं पेपरमध्येही नाव आलं. नंतर जेव्हा अधिवेशनात त्यांनी उभं राहून सांगितलं की या घोटाळ्याविषयी बाकी कुणीही बोललं नाही. हा घोटाळा असल्याने आमच्या सरकारने ही निविदा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय कोणतंही मंत्रीपद नसताना तुम्ही सदनात कसा काय जाहीर केला? दुसरं म्हणजे या निर्णयाची अंमलबजावणी होणार की नाही ते ही सांगा. काल परवाकडे मी पत्रकार परिषदेत सांगितलं की बरोबर भाजपची संस्कृती त्यांनी पाळलेली आहे आणि भर सदनात ते खोटं बोलले आहेत. खरंतर हा हक्कभंग आहे. कारण, हे कंत्राट रद्द झालेलं नाही. कदाचित इलेक्टोरल बॉन्ड प्रमाणे पैसे भाजपने खाल्ले असतील पण हे कंत्राट अद्याप रद्द झालेलं नाही. जे उमेदवार अधिवेशनात खोटं बोलतात, ते उमेदवार जिंकले तर जनतेशी खोटं बोलतील, असे उमेदवार तुम्हाला चालणार आहेत का?, असा प्रश्नही आदित्य ठाकरे यांनी विचारला.

पियूष गोयल यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला. ‘दुसरे उमेदवार मुंबईविषयी अत्यंत भीतीदायक गोष्ट बोलले आहेत. एका मुलाखतीत ते म्हणाले की, माझं एक स्वप्न आहे की मुंबईला झोपडपट्टी मुक्त बघायचं आहे. अनेक वर्षं आपण हे स्वप्न पाहिलं आहे. माझे आजोबा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनीही हे स्वप्न पाहिलं होतं. म्हणूनच एसआरए योजना आणू शकलो होतो. पण या योजनेत जिथे झोपडी तिथे घर अशी तरतूद आहे. पण गोयल म्हणाले की, झोपु योजना काढून मिठागरांकडे पाठवून द्यायचं. हे तुम्हाला मंजूर आहे का? आपली गोरगरीब जनता जी आपल्या पुनर्वसन योजनेत येणार, ही आपली भूमिका आहे. ज्या विकसित भारतविषयी हे लोक बोलतात, त्या विकसित भारतात या मजुरांचीही मेहनत आहे. स्थानिकांचे रोजगार आहेत. तुम्हाला वचन देतो, हे दोन्ही खोटं बोलणारे, मुंबईकरांना बेघर करणाऱ्या उमेदवार आहेत, त्यांना निवडून द्यायचं नाही, ही शपथ आपण घेतली पाहिजे. कारण मुंबईकराच्या मुळावर येणाऱ्या भाजपला मुंबईपासून दूर ठेवलं पाहिजे, असं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी भाजपच्या फोडा आणि राज्य कराच्या धोरणावरही कडाडून टीका केली. ‘आज सर्वांना भेटून आनंद होतोय. ही जरी शाखाभेट असली तरी मला रस्त्यावर कुठेच मोकळी जागा दिसत नाहीये, सगळीकडे महाराष्ट्रप्रेमी मुंबईकर दिसत आहेत. ही लढाई आता फार महत्त्वाची ठरत चालली आहे. ही लढाई आपल्या देशात लोकशाही टिकणार की नाही टिकणार, संविधान बदलू देणार की नाही बदलू देणार, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून दिलेलं संविधान भाजपला बदलू देणार की नाही देणार यावर आता ही लढाई आली आहे. काल मी यवतमाळ-वाशिमला होतो, तेव्हा जे वातावरण पाहत होतो; फॉर्म भरण्यासाठीची सभा होती, जाहीर सभाही नव्हती. तरीही दुपारी12-1 वाजता, 40 डिग्री उन्हामध्ये तुफान भरलेली अशी गर्दी होती. सगळे एकच सांगत होते की आम्हाला आता महाविकास आघाडीचं सरकार केंद्रात आणि राज्यात पाहिजे. इंडिया आघाडी जिंकली पाहिजे. तिथले आपले उमेदवार संजय देशमुख हे लढायला सिद्ध झाले आहेत. पण, गंमत म्हणजे अजून समोरचा महायुतीचा उमेदवारच ठरलेला नाही. महायुतीची सगळी गडबड सुरू आहे. महायुतीतले भाजप आहे, मिंधे गँग आहे, राष्ट्रवादीची गद्दार गँग आहे, ईडी-आयटी-सीबीआय आहेत. तरीही त्यांना उमेदवारच मिळत नाहीये. म्हणून आता बाजूच्या कुठच्यातरी मतदारसंघातून उमेदवार खेचून आणताहेत, असं मी ऐकलं आहे. आज देखील मुंबईत दोन सोडून इतर उमेदवारच घोषित केलेले नाहीत. उमेदवारच मिळत नाहीयेत. जेव्हा आपण एनडीएमध्ये होतो, उद्धव ठाकरे भाजपसोबत होते, भाजप निश्चिंत होता. प्रचार करायची गरज नाही, मोठे-छोटे पक्ष फोडायची गरज नाही, परिवार फोडायची गरज नाही. शिवसेना-भाजप एकसाथ असताना भाजपला अजिबात टेन्शन नव्हतं. पण आज उमेदवारही मिळत नाहीत, अशी परिस्थिती आलेली आहे. आज जळगावमधील त्यांचे एक सिटींग उमेदवार भाजप सोडून आपल्या पक्षात आले. त्यांनी पण हेच सांगितलं की ही लढाई आता काही राजकीय पक्षांची राहिली नाही. ही लढाई आता महाराष्ट्रहित आणि देशहिताची झालेली आहे.’

‘आज मी एक फोटो पाहिला. बोरिवलीमधलं स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान आहे, त्याचं नाव गुजरातीत लिहिलं आहे. आपलं काही गुजरातशी भांडण नाही. पण, आपली भाषा, स्वाभिमान, संस्कृती पुसून उद्या मंत्रालयसुद्धा गुजरातमधून चालवतील अशी भीती वाटायला लागली आहे. हा विचार तुम्ही देखील करणं गरजेचं आहे. आजच्या पेपरमध्येही 2014पासून ते 24पर्यंत साधारणपणे 25 मोठ्या नेत्यांवर ईडी-आयटी-सीबीआयच्या कारवाई झाल्या आहेत. या 25मधून 23 नेते असे आहेत, ज्यांनी भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये उडी मारलेली आहे. त्यानंतर त्यांच्या केसेस बंद झाल्यात किंवा बाजूला ठेवल्या आहेत. हे तर मोठे नेते झाले. आज त्यांनी शेकडो नेते, स्थानिक पदाधिकाऱ्यांची नावं दिलेली आहेत. आपल्यातूनच 40 गद्दार जे पळाले, त्यातल्या प्रत्येकावर ईडी-आयटी-सीबीआयचा याचाच ठपका होता. मिंधे गँगचे नेते जे आता घटनाबाह्य मुख्यमंत्री बनलेत, त्यांचा चेहरा त्यात नाहीये. पण त्यांना जेव्हा गुजरातला याच कारणामुळे पळाले. जर आपल्यात राहिले असते तर भ्रष्टाचारासाठी त्यांच्यावर कारवाई झाली असती. त्यांना जेलमध्ये जावं लागलं असतं आणि त्यामुळे ते भाजपात गेले.’

‘2022मध्ये शिवसेना फोडली, 2023मध्ये राष्ट्रवादी फोडली, 2024मध्ये काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. तीन पक्ष, एक परिवार फोडूनदेखील हे जे अवकाळी सरकार आपल्या डोक्यावर बसवलेलं आहे. ते एका बाजूला, त्यांना उमेदवारही मिळत नाहीयेत. आणि इथे आपले वाघ दिल्लीच्या दिशेने तयारी करत आहेत. आणि हे सगळे वाघ, तुम्ही सगळे आपण आपल्या महाराष्ट्रासाठी लढत आहोत. या सगळ्यांनाही धमक्या आल्या होत्या, भाजपची पॉलिसी हीच आहे, जॉईन ऑर जेल. आमच्या पक्षात या किंवा जेलमध्ये जा. या सगळ्यांनी सांगितलं की आम्हाला जेलमध्ये टाका पण आम्ही महाराष्ट्राशी आमच्या पक्षाशी गद्दारी करणार नाही. संजय राऊत हे याचं ज्वलंत उदाहरण आहेत. परवाकडे दिल्लीतही त्यांच्याबद्दल लोकांमध्ये एक वेगळी भावना आहे. हा माणूस लढला, जेलमध्ये गेला, बाहेर आला, तरीही लढत आहे. ही भावना मला त्यांच्यात दिसत होती, आदर दिसत होता. ‘

‘देशात आता परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत. खोटं बोलणारे, भ्रष्ट लोक, मातीशी आणि पक्षाशी गद्दारी करणारे, पक्ष-परिवार फोडतात, अशा जुमलेबाज लोकांना आम्ही निवडून देणार नाही. हेच सगळीकडे दिसायला लागलं आहे. दक्षिण भारताने भाजपला दारं बंद केली आहेत. तिथे एकसुद्धा सीट मिळणार नाही. पण उत्तर भारतातही आता चमत्कार घडणार आहे. बिहारमध्ये तेजस्वी यादव लढताना दिसत आहेत. ते माझ्या वयाचे आहेत. आम्ही दोघंही आमच्या राज्यासाठी, स्थानिक जनतेसाठी लढत आहोत. मी आज तुम्हाला प्रश्न विचारतोय की हा चमत्कार महाराष्ट्रात दिसणार की नाही? महाराष्ट्र हे परिवर्तन घडवणार की नाही? हेच मी विचारत आहे. आपल्याला मुंबईचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवायचा आहे. मुंबईकराला दिल्लीत बसवायचं आहे.’